शहराच्या विनायकनगर भागातील समता कॉलनीमध्ये अत्यंत निर्घृणपणे खून केलेल्या पती-पत्नीचे मृतदेह राहत्या घरात आढळले. या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे. खुनाचा उद्देश स्पष्ट झालेला नसला, तरी घरात बरीच उचकापाचक झाल्याने ही घटना चोरीच्या उद्देशाने झाली असावी, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. बुधवारी रात्री साडेनऊनंतर झालेला हे खून गुरुवारी सकाळी अकरानंतर उजेडात आले.
प्रकाश गुलाब रोडे (वय ५२) व त्यांची पत्नी मीना (वय ४५) अशी दोघांची नावे आहेत. हे कुटुंब विनायकनगरमागील फुलसौंदर मळय़ात, नव्यानेच विकसित झालेल्या समता कॉलनीतील रो हौसिंगमध्ये राहते. प्रकाश रोडे हवाई दलातील निवृत्त कर्मचारी आहेत व सध्या एमआयडीसीतील लार्सन अँड टुब्रो कंपनीत सुरक्षा अधिकारी आहेत. त्यांच्या पत्नी गृहिणी आहेत. हे कुटुंब मूळचे सुरेगावचे (ता. श्रीगोंदे). मुलगा स्वप्निल नौदलात आहे. सध्या तो अमेरिकेला गेला आहे. मुलगी कोमल पुण्यात शिकते आहे. घरात पती-पत्नी दोघेच राहतात.
पोलीस उपाधीक्षक यादवराव पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार घटना बुधवारी रात्री साडेनऊ ते आज सकाळी अकराच्या दरम्यान घडली. विनायकनगर भागात मध्यरात्री एकच्या सुमारास मनपाच्या नळाला पाणी आले, त्यासाठी समता कॉलनीतील नागरिक पाणी भरण्यासाठी उठले होते. मात्र त्यापूर्वी की नंतर ही घटना घडली हे स्पष्ट झाले नाही. आज सकाळी रोडे कुटुंबाकडे धुण्याभांडय़ाचे काम करणारी महिला अकराच्या सुमारास आली. तिने हा प्रकार प्रथम पाहिला. तिने घाबरून ही माहिती जवळच राहणाऱ्या माजी महापौर भगवान फुलसौंदर यांना सांगितली. नंतर कोतवाली पोलिसांना घटनेची माहिती मिळाली. घटनास्थळी जिल्हा पोलीस अधीक्षक लखमी गौतम यांनी भेट देऊन तपासासाठी सूचना दिल्या. त्यानुसार पथके स्थापन करण्यात आली.
मीना व प्रकाश या दोघांना अत्यंत क्रुरतेने मारण्यात आले आहे. दोघांच्या डोक्यात, तोंडावर कठीण वस्तूने मारण्यात आले आहे. मीना यांचा मृतदेह घरातील शौचालयात पडलेला होता, तर प्रकाश यांचा हॉलमध्ये. मीना यांच्या पायात स्लिपर होत्या, त्यामुळे त्या कोणत्या तरी कारणावरून त्या जाग्या होऊन बाहेर आल्या असाव्यात, असा पोलिसांचा अंदाज आहे. कारण घराचा बाहेरील दरवाजा उघडाच होता व पाठीमागील दरवाजा बंद होता. प्रकाश बराच काळ जखमी अवस्थेत पडल्याने त्यांचा मृत्यू अतिरक्तस्रावाने झाला आहे.
मीना यांचे बंधू दत्तात्रेय खेंगट (रा. बांबुर्डी) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार कोतवाली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. घरात बरीच उचकापाचक झाल्याने चोरी झाल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. मात्र मोटारसायकल (एमएच १६ एके ५०५५), मीना यांच्या कानातील दागिना व गळय़ातील मंगळसूत्र याव्यतिरिक्त आणखी कशाची चोरी झाली, हे सायंकाळपर्यंत स्पष्ट झालेले नाही. मंगळसूत्रातील सोन्याचे काही मणी घरातच पडले होते. क्रुरतेच्या पद्धतीवरून ही मारहाण विशिष्ट गुन्हेगार जमातीने केली असावी, असा पोलिसांचा अंदाज आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक बाळकृष्ण हनपुडे पाटील करत आहेत.
नेमके कारण स्पष्ट नाही
खुनाचे नेमके कारण स्पष्ट झालेले नाही. प्रकाश रोडे एल अँड टी कंपनीत सुरक्षा अधिकारी म्हणून काम करताना त्यांनी जुलैमध्ये कारखान्यातील एक चोरी पकडून दिली होती. त्यामध्ये कंपनीतीलच एक कंत्राटी कामगार, मुकुंदनगर व बोल्हेगावमधील दोघा तरुणांना अटक करण्यात आली होती. त्याची फिर्यादही रोडे यांनी एमआयडीसी पोलिसांकडे दिली होती. या घटनेचा खुनाशी काही संबंध आहे का, याची खातरजमाही पोलीस करत आहेत.