डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या व गोविंद पानसरे यांच्यावरील हल्ला म्हणजे सामाजिक विचारवंत संपविण्याचा प्रयत्न आहे. ही घटना निंदनीय आहे. पानसरे यांच्या कुटुंबीयांशी चर्चा केल्यावर तपासासाठी पोलिसांबरोबर मुंबई क्राइम ब्रँचसारख्या विभागाला जोडून द्यावे अशी बाजू समोर येत आहे. दाभोलकर खून तपासातील दिरंगाईप्रमाणे यात दिरंगाई होऊ नये, शासनाने हा तपास गांभीर्याने करून आरोपींना तात्काळ अटक करावी, अशी मागणी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी बुधवारी येथे पत्रकार परिषदेत बोलताना केली.
मुंडे यांनी आज येथील अ‍ॅस्टर आधार रुग्णालयात येऊन ज्येष्ठ नेते गोिवद पानसरे व त्यांच्या पत्नी उमा यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. तसेच पानसरे यांच्या कुटुंबीयांनी संवादही साधला. यानंतर शासकीय विश्रामगृहावर त्यांनी पत्रकार परिषदेत आपली भूमिका मांडली.
एसआयटीने चौकशी करावी
पानसरे दाम्पत्याच्या प्रकृतीची चौकशी केल्यानंतर ज्येष्ठ परिवर्तनवादी नेते डॉ. प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकारांशी बोलताना पानसरे हल्ल्याचा तपासासाठी पोलिसांना एसआयटीची (विशेष तपास पथक) मदत देण्यात यावी, अशी मागणी केली. ते म्हणाले, या हल्ल्याच्या तपासासाठी सध्या पोलिसांना एटीएसची (दहशतवादविरोधी प्रतिबंधक पथक) दिली जात आहे. एटीएसमधील काही अधिकारी वैचारिकदृष्टय़ा भ्रष्ट असल्याने त्यांच्या सहभागामुळे तपासाची दिशा भरकटू शकते. त्यामुळे पोलिसांना सीआयडी, सीबीआय यांच्याबरोबरच एसआयटीची मदत दिली जावी अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन करणार आहोत. देशात धार्मिक उन्माद वाढावा अशी पावले टाकली जात आहेत. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशात निधर्मी वातावरण राहील असे सांगत आहेत. त्यांचीही भूमिका भाजप, आरएसएस, बजरंग दल, विश्व हिंदू परिषद यांना मान्य आहे का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
ते म्हणाले, शाहूंचा समतेचा विचार असणाऱ्या कोल्हापुरात ही घटना घडल्याने पुरोगामी महाराष्ट्राला काळिमा फासला गेला आहे. माणूस मारला की विचार समतो, अशा विचारांचे लोक असा भ्याड हल्ला करत आहेत. पानसरे यांच्यावरील हल्ल्यात गोडसे प्रवृत्तीच्या संघटना तसेच टोलविरोधी आंदोलनात त्यांचा असलेला सहभाग, हे दोन संशयाचे मुद्दे आहेत. घटनेला तीन दिवस झाले तरी आरोपी मोकळे आहेत. दाभोलकर यांच्या खुनाच्या तपासात पोलिसांकडून दिरंगाई झाली. त्या वेळी आमचे सरकार होते, ही दिरंगाई आम्ही कबूलही केली आहे. पण आता तशी दिरंगाई होता कामा नये, पोलिसांना तपासात मदत व्हावी म्हणून मुंबई क्राइम ब्रँचची मदत घेतली जावी. यासाठी आपण मुख्यमंत्री व पोलीस महासंचालक यांची भेट घेणार आहोत. त्यांना याची माहिती देऊन पोलिसांकडून तपासात दिरंगाई होणार नाही, याबाबत खबरदारीची सूचना करणार आहे. पुरोगामी विचार महाराष्ट्रात रुजवणाऱ्या ज्येष्ठ नेत्यांना संरक्षण देण्यात यावे, अशी आमची मागणी असणार आहे. पानसरे यांच्यावरील हल्ल्याचा तपास समाधानकारक न झाल्यास राष्ट्रवादी काँगेस रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करेल, असा इशाराही त्यांनी या वेळी दिला.