टोल आकारणीवरून झालेल्या वादातून कळंबा येथील आयआरबी कंपनीचा टोलनाका संतप्त जमावाने शनिवारी फोडला. शंभराहून अधिक ग्रामस्थांनी हल्लाबोल केल्याने टोलनाक्यावरील केबीन, फíनचर याची मोठय़ा प्रमाणात नासधूस झाली. या प्रकारामुळे टोलनाक्यावरील टोल आकारणी बराच काळ बंद पडली होती.
गारगोटी येथील सदानंद जाधव यांनी अलीकडेच नवीन मोटार खरेदी केली आहे. या मोटारीतून ते कुटुंबीयांसमवेत करवीरनिवासिनी महालक्ष्मीच्या दर्शनासाठी निघाले होते. शनिवारी ११ वाजण्याच्या सुमारास ते कळंबा टोलनाक्याजवळ आहे. तेथे टोल आकारणी करणा-या आयआरबी कंपनीच्या कर्मचा-यांनी त्यांच्याकडे टोलची रक्कम मागितली. जाधव व त्यांचे बंधू जीवन जाधव यांनी टोल देणार नाही अशी भूमिका घेतली. यातून जाधव बंधू व टोल कर्मचा-यांमध्ये वादावादी सुरू झाली. कर्मचा-यांनी टोल देणार नसाल तर पर्यायी मार्गाने निघून जावे असा सल्ला दिला. त्यानुसार जाधव हे टोल नाक्यापासून गाडी मागे घेत होते. याच वेळी टोल नाक्यावरील कर्मचा-याकडून बॅरेकेट्स गाडीच्या मागच्या भागावर पडले. यामध्ये गाडीचा काही भाग चेपला गेल्याने जाधव हे संतप्त झाले. त्यातून जाधव बंधू व टोल कर्मचा-यांमध्ये पुन्हा हुज्जत सुरू झाली.
त्याच वेळी गारगोटी येथील काही प्रवासी वडाप वाहतूक करणा-या वाहनातून टोल नाक्याजवळून जात होते. त्यातील काहींनी जाधव बंधूंना ओळखले व हे प्रवासीसुद्धा जाधव यांच्या बाजूने वादात उतरले. यामुळे वादाला उग्र स्वरूप प्राप्त झाले. हा प्रकार पाहून कळंबा येथील ग्रामस्थही घटनास्थळी जमू लागले. अगोदरच कळंबा येथील ग्रामस्थांमध्ये टोल आकारणी विरोधात संताप आहे. या प्रकाराने त्यांच्या संतापाला उकळी फुटली. कळंबा ग्रामस्थांनी जाधव बंधूंची बाजू घेऊन वादात उडी घेतली. आणि थोडय़ाच वेळात मुद्याचे प्रकरण गुद्यावर आले. संतप्त ग्रामस्थांनी टोल नाक्याला लक्ष्य करीत मोडतोड सुरू केली. टोल आकारणी करणारी केबीन जमीनदोस्त करण्यात आली. त्यावर दगडकाठय़ांचा मारा करण्यात आला. टोलनाका परिसरात काचांचा खच पडला होता. तर हा प्रकार सुरू झाल्याने टोलनाक्यावरील कर्मचारी पळून गेले. घटनास्थळी काही काळाने करवीर पोलीस ठाण्याचे पोलीस दाखल झाल्यानंतर हा वाद शमला. मात्र त्यानंतरही बराच काळ टोल आकारणी बंद पडली होती.