सरकारी नोकऱ्यांमध्ये बढतीतील आरक्षणाच्या घटनादुरुस्ती विधेयकावरून बुधवारी लोकसभेत जबरदस्त रणकंदन झाले. समाजवादी पक्षाचे खासदार यशवीर सिंह यांनी लोकसभेत विधेयक मांडले जात असताना पंतप्रधानांच्या कार्यालयाचे राज्यमंत्री नारायण सामी यांच्या हातून विधेयकाची मूळ प्रत हिसकावून नेली. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी संतापून यशवीर सिंह यांच्याकडून विधेयक काढून घेण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे काँग्रेस व समाजवादी पक्षाच्या सदस्यांमध्ये जोरदार धक्काबुक्की आणि बाचाबाची झाली. समाजवादी खासदारांच्या धक्काबुक्कीत सोनिया गांधी इजा होता होता वाचल्या. या अभूतपूर्व गोंधळामुळे लोकसभेचे कामकाज अध्यक्षांनी दिवसभरासाठी तहकूब केले.
बुधवारी दुपारी तीन वाजता हे ११७ वे घटनादुरुस्ती विधेयक मांडण्यासाठी नारायण सामी उभे राहिले, तेव्हा समाजवादी पक्षाच्या सदस्यांनी जोरदार विरोध सुरू केला. तेवढय़ात यशवीर सिंह कुणाच्या नकळत सत्ताधारी बाकांच्या बाजूने नारायण सामींपाशी पोहोचले आणि त्यांच्या हातातील विधेयकाची प्रत त्यांनी अलगद पळवून नेली. ते पाहताच सोनिया गांधी संतापल्या. त्यांनी यशवीर सिंह यांना लोकसभा अध्यक्षांसमोरच्या मोकळ्या जागेत गाठले आणि त्यांच्याकडून विधेयकाची प्रत काढून घेण्याचा प्रयत्न केला. तेवढय़ात यशवीर सिंह यांनी विधेयकाची प्रत त्यांच्याच पक्षाचे नीरज शेखर यांच्या हाती दिली आणि शेखर यांनी ती भाजपच्या बाकांच्या दिशेने भिरकावली. या गोंधळात समाजवादी पक्षाचे काही खासदार उग्र झाले आणि सोनिया गांधी पडता पडता वाचल्या. सोनियांच्या बचावासाठी धावलेले काँग्रेसचे विलास मुत्तेमवार आणि बापी राजू कन्नीमुरी यांची समाजवादी पक्षाच्या खासदारांशी जुंपली. मुत्तेमवार यांनी यशवीर सिंह यांचे तोंड धरून त्यांना मागे ढकलण्याचा प्रयत्न केला, तर नीरज शेखर धक्काबुक्की करण्याच्या उद्देशाने तावातावाने असंसदीय भाषेत बोलत होते. समाजवादी पक्षाचे ब्रिजभूषण सिंह, धर्मेद्र यादव आणि सुबोधकांत सहाय यांनी, सोनियांचा बचाव केला व आक्रमक झालेल्या समाजवादी पक्षाच्या अन्य सदस्यांपासून दूर केले.
विधेयक आज पुन्हा लोकसभेत
बढतीतील आरक्षण विधेयक गुरुवारी पुन्हा मांडण्यात येईल, असे सरकारने स्पष्ट केले आहे. गुरुवारी अधिवेशनाचा समारोप होणार आहे. बढतीतील आरक्षण विधेयक पारित झाल्यास यूपीए सरकारचा पाठिंबा काढून घेण्याची धमकी २२ खासदार असलेल्या समाजवादी पक्षाने दिली आहे.