नव्या महापालिकेत महापौरपदावरून शिवसेना-भाजपमध्ये वाद सुरू आहे. प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे व पालकमंत्री रामदास कदम यांच्यात शनिवारी झालेल्या बैठकीत काहीही तोडगा निघाला नाही. भाजपने महापौरपद आपल्यालाच मिळावे, यासाठी जोरदार मोहीम उघडली आहे. प्रदेशाध्यक्ष दानवे यांना शनिवारी भाजपचा महापौरपदाचा उमेदवार कोण हे सुचवतानाही बरीच कसरत करावी लागली. अखेर भाजपने राजू शिंदे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या जवळचे कार्यकर्ते म्हणून ते ओळखले जातात. उपमहापौरपदासाठी प्रमोद राठोड यांचे नाव निश्चित करण्यात आले. या दोघांनी नामनिर्देशनपत्रे नेली आहेत.
दरम्यान, शिवसेनेने त्र्यंबक तुपे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याचे सेनेच्या सूत्रांकडून सांगण्यात आले. त्यांनीही नामनिर्देशनपत्र नेले आहे. भाजपकडून नितीन चित्ते यांच्या नावाचा विचार केला जात होता. मात्र चर्चेअंती राजू शिंदे यांचे, तर उपमहापौरपदासाठी राठोड यांचे नाव निश्चित करण्यात आले. चित्ते यांच्याच नावाचा विचार दुपारी अडीचपासून संध्याकाळी पाचपर्यंत सुरू होता. अगदी नामनिर्देशनपत्रही त्यांनी भरावे, असे सुचविण्यात आले. मात्र, साडेपाच वाजता राजू शिंदे यांचे नाव नाटय़मयरीत्या पुढे आले.
या घडामोडींमागे भाजपतील अंतर्गत गटबाजी कारणीभूत असल्याची जोरदार चर्चा होत होती. शिवसेनेने मात्र भाजपला महापौरपद देण्यास साफ नकार दिला आहे. चर्चेची गाडी याच मुद्दय़ावर अडली आहे.
दरम्यान, युतीचाच महापौर होणार असल्याचे संकेत दोन्ही बाजूंकडून दिले जात असले, तरी या संदर्भात युतीच्या नेत्यांमध्ये अजून एकवाक्यता होत नसल्याचे चित्र शनिवारी कायम होते.
महापालिकेत गेली २८ वर्षे शिवसेना-भाजप युतीची सत्ता असून, या वेळीही युतीलाच सत्तेचा कौल मिळाला. मात्र, पूर्ण बहुमतासाठी युतीला बंडखोर व अपक्ष नगरसेवकांची मदत घेणे क्रमप्राप्त ठरले आहे. सेनेचे २८, तर भाजपचे २२ असे संख्याबळ आहे. निवडून आलेले ११ बंडखोर नगरसेवक मूळचे युतीचेच आहेत. यात भाजपकडे किती व सेनेकडे किती, यावर महापौरपदाची गणिते ठरणार आहेत. त्यामुळे दोन्ही पक्षांमध्ये मोठी चुरस निर्माण झाली आहे.  
सेनेने आपल्या नगरसेवकांना शुक्रवारी रात्री लोणावळय़ास सहलीला पाठविले. मुंबईला जायचे आहे, असे सांगून या सर्वाचा लवाजमा प्रत्यक्षात लोणावळय़ाकडे नेण्यात आला. या नगरसेवकांना एकाच बसमधून सहलीस नेण्यात आले.