महापालिका निवडणुकीत मतदारांचे आपल्याकडे लक्ष जावे यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे प्रचाराचे हातखंडे वापरले जातात. आज सकाळपासून उमेदवारांनी घरोघरी जाऊन प्रचाराला जोरदारपणे सुरुवात केली. मात्र, काही अपक्षांनी नवीनच संभ्रम निर्माण करून ठेवले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या छायाचित्र वापरून अपक्ष उमेदवारांनी प्रचाराला सुरुवात केली. एकाच वॉर्डात असे घडले नाही, तर वेगवेगळ्या ठिकाणी, वेगवेगळ्या पक्षांच्या नेत्यांचे छायाचित्र वापरून संभ्रम निर्माण केले जात आहे.
अधिकृत उमेदवारी न मिळालेल्या नाराजांनी केलेल्या या प्रचाराच्या युक्तीमुळे नागरिक संभ्रमात आहेत. शहरात प्रत्येक वॉर्डात उमेदवारांनी प्रचार कार्यालय उघडली असून सकाळपासून घरोघरी जाऊन भेटी घेण्यावर भर दिला जात आहे. अद्याप एकाही बडय़ा नेत्याची सभा महापालिका निवडणुकीच्या प्रचारादरम्यान झालेली नाही. उद्या पालकमंत्री रामदास कदम यांची सभा होणार आहे. शिवसेनेच्या प्रवक्तया नीलम गोऱ्हे, भाजपचे राज्यसभेचे खासदार अमर साबळे आदींनी वॉर्डात जाऊन प्रचार केला.
 काँग्रेसच्या प्रचारासाठी राधाकृष्ण विखे पाटील, माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात प्रचारात सहभागी होणार असून काँग्रेस कार्यकर्त्यांनीही वॉर्डात संपर्क वाढविला आहे. दुसरीकडे एमआयएमच्या प्रचारासाठी ओवेसी बंधू औरंगाबाद येथे मुक्कामी येणार आहेत. तर प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याही सभा होणार आहेत.
 बंडोबांना थंड करण्यासाठी संयुक्त प्रचारफेरीचा उतारा युतीत ठरला असला, तरी अशा प्रचारफे ऱ्या नक्की कधीपासून होतील, हे अजून ठरलेले नाही. त्यामुळे प्रत्येक वॉर्डात अपक्षांना पाठबळ देण्याचे धोरण बडय़ा नेत्यांनीही हाती घेतले आहे. त्यामुळेच काही उमेदवारांनी अधिकृत पक्षाचे चिन्ह न वापरता नेत्यांची छायाचित्रे लावून संभ्रमित प्रचार सुरू ठेवला आहे. त्यामुळे कोणता उमेदवार पक्षाचा व कोणता पुरस्कृत हे सांगण्यासाठी नेत्यांना नव्याने धडपड करावी लागत आहे. त्यामुळे प्रत्येक वॉर्डात बैठकाही घ्याव्या लागत आहे. वांद्रा पोटनिवडणुकीचा निकाल लागेपर्यंत संभ्रम राहील आणि त्यानंतरच प्रचाराच्या तोफा धडाडतील, असे सांगितले जात आहे.