लोकशाही मार्गाने निवडणुका लढविणाऱ्या भाजपमध्ये हुकूमशाही प्रवृत्तीची ठोकशाही निर्माण झाली असून वरिष्ठ नेत्यांना अवमानजनक वागणूक दिली जात असल्याचा आरोप मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगलीच्या कृष्णातीरी झालेल्या प्रचार सभेत केला. देश उद्ध्वस्त करू पाहणारे मोदींचे गोध्रा मॉडेल धर्मनिरपेक्ष देशाला परवडणारे नाही असेही या वेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
काँग्रेस उमेदवार प्रतीक पाटील यांच्या प्रचाराचा शुभारंभ बुधवारी वसंतदादा पाटील यांच्या स्मृतिस्थळानजीक करण्यात आला. या वेळी मुख्यमंत्र्यांसह वनमंत्री डॉ. पतंगराव कदम, गृहमंत्री आर. आर. पाटील, ग्रामविकासमंत्री जयंत पाटील आदींसह काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे आजीमाजी आमदार, पदाधिकारी उपस्थित होते.
या वेळी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजपमध्ये ज्येष्ठ नेत्यांना नरेंद्र मोदी कस्पटासमान वागणूक देत असल्याचा आरोप करून केवळ मोदी सरकारचा प्रचार जनतेला रुचणारा नसल्याचे सांगत प्रगतीच्या आलेखात आजही महाराष्ट्र अव्वल असून िहमत असेल तर नरेंद्र मोदी यांनी चच्रेसाठी एका व्यासपीठावर यावे असे जाहीर आवाहन केले.  ज्या लालकृष्ण आडवाणी यांनी मोदींची पाठराखण केली त्यांना अवमानित करण्यात आले. जसवंत सिंगांसारख्या ज्येष्ठ नेत्यावर तिकीट वाटपामध्ये अन्याय करण्यात आला. यामुळे पक्ष केवळ एका व्यक्तीच्या इशाऱ्यावर चालत असल्याचे स्पष्ट होते असे सांगितले. मोदींची वक्तव्ये हुकूमशाही आणि ठोकशाही पद्धतीची असून हे सामान्य जनता कधीही सहन करणार नाही असेही मुख्यमंत्र्यांनी या वेळी सांगितले. भांडवलशाही व्यवस्थेला प्रोत्साहन देणारी आभासनिर्मिती जातीयवादी शक्तीकडून सुरू असून जनतेने उद्योगपतींना पोषक भूमिका घेणाऱ्या नरेंद्र मोदींना जनताच त्यांची जागा दाखवेल असा इशाराही त्यांनी दिला.
या वेळी गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी ग्लोबल पद्धतीने प्रचार करण्याची कुटिल नीती भाजप अवलंबून असून पुरोगामी विचाराचा महाराष्ट्र या नीतीला बळी पडणार नाही असे सांगून ते म्हणाले, की सांगली, कोल्हापूर या मतदारसंघात युतीला उमेदवार आयात करावे लागले तर माढा येथील जागा वाटपावरून युतीत मतभेद निर्माण झाले आणि साताऱ्यात तर अद्याप उमेदवारच निश्चित होऊ शकत नाही. यातच महायुतीचा पराभव अधोरेखित होतो.  विकासाच्या पातळीवर महाराष्ट्र गुजरातपेक्षा अग्रेसर असून केवळ जातीय तेढ निर्मितीत गुजरात सर्वाच्या पुढे आहे. आम्ही पाच पांडव म्हणणाऱ्या युतीमध्ये शिवसंग्रामच्या विनायक मेटेंना सहभागी करून महायुती कौरव बनू पाहात आहे. स्थानिक पातळीवर शिवसेनेची ताकद खच्ची करून भाजप मनसेचे सहकार्य घेण्यास उतावळा झाला असून अशा विश्वासघातकीपणामुळेच महायुतीला यश मिळणे दुरापास्त आहे. या वेळी राष्ट्रवादीचे नेते इलियास नायकवडी यांनीही अल्पसंख्याक समाजात असुरक्षेची भावना निर्माण करणाऱ्या मोदींना धर्मनिरपेक्ष शक्ती कधीही सफल होऊ देणार नाही असे सांगितले.