रस्ता सुरक्षा जनजागरण अभियानात सातत्य आवश्यक आहे. केवळ वर्षांतील आठवडाभर जाहिरातबाजी व बॅनरबाजी करून काहीही उपयोग  होणार नाही. वाहतुक नियमावली पाळली गेली, तरच अपघातांचे प्रमाण कमी होणार आहे. पण, वाहतूक नियमांबाबत निष्काळजीपणा दाखविला जात असल्याने नियम मोडणाऱ्यांवर कठोर कारवाई झालीच पाहिजे, कारवाईवेळी भेदभाव नको. कायदा सर्वाना समान असल्याचे भान ठेवा, अशा सक्त सूचना आमदार व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिल्या.
रस्ता सुरक्षा जनजागरण अभियानांतर्गत झालेल्या बक्षीस वितरण समारंभात ते बोलत होते. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी स्टिव्हन अल्वारिस, पोलीस उपअधीक्षक मितेश घट्टे, रवींद्र खंदारे उपस्थित होते.
चव्हाण म्हणाले, की वाहनांची संख्या गेल्या काही वर्षांत मोठय़ा प्रमाणावर वाढली आहे. मात्र, रस्त्यांची संख्या वाढविता येत नाही. कराडसारख्या ठिकाणी पार्किंगची समस्या मोठय़ा प्रमाणावर भेडसावत आहे. या समस्येसह वाहतुकीचा प्रत्येक नियम प्रत्येक वाहन चालकाने पाळण्याची गरज आहे. फक्त एका वाहन चालकाने नियम पाळल्याने अपघातांची संख्या कमी होऊ शकत नाही. त्यामुळेच वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या प्रत्येक वाहन चालकावर कठोर कारवाई होणे आवश्यक आहे. कारवाई करताना पोलीस व उपप्रादेशिक परिवहन खात्याने कोणताही भेदभाव करू नये. कायदा सर्वाना समान आहे हे नागरिकांनीही लक्षात ठेवावे असे त्यांनी सांगितले. प्रास्ताविक स्टिव्हन अल्वारिस यांनी केले.