जीवनातील अद्भुत प्रसंगांची संयमित भाषेत केलेली मांडणी हे ‘मार्गस्थ’ या आत्मचरित्राचे वैशिष्टय़  आहे. फापटपसारा नसलेले गद्य म्हणून या पुस्तकाचा आवर्जून उल्लेख करता येईल. आयुष्य बदलायला कधी उशीर झालेला नसतो याची जाणीव हे आत्मकथन देते, असे प्रतिपादन प्रसिद्ध लेखक विनय हर्डीकर यांनी केले.
येथील गणेश वाचनालयात बी. रघुनाथ महोत्सवानिमित्त ‘एक पुस्तक एक दिवस’ या मालेत बा. भो. शास्त्री यांच्या ‘मार्गस्थ’ या पुस्तकावर चर्चा झाली. यावेळी हर्डीकर यांनी आपले विचार व्यक्त  केले. संजयशास्त्री दर्यापूरकर हेही यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.
यावेळी बोलताना हर्डीकर म्हणाले, वयाच्या सतराव्या वर्षांपर्यंत साधी अक्षर ओळखही नसलेल्या माणसाने आयुष्यात एवढी मोठी मजल गाठावी, ही घटना अर्थपूर्ण आहे. ऐहीक सुखाचा धिक्कारही नाही आणि लौकिक जीवनाबद्दलचा तिरस्कारही नाही, अशा पद्धतीने या पुस्तकातून जीवनानुभव व्यक्त  झाले आहे. ‘तुका म्हणे झरा, आहे मुळचाच खरा’ या पद्धतीने या पुस्तकाचे लेखन झालेले आहे. या पुस्तकात कोणतेही शब्दाचे खेळ नाहीत, असेही हर्डीकर म्हणाले. ‘मार्गस्थ’ मधील अनुभव अनेक माध्यमाद्वारे साकारता येऊ शकतात. या पुस्तकावर नाटक, चित्रपटही तयार केला जाऊ शकतो, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी ‘मार्गस्थ’चे लेखक शास्त्री यांनी आपल्या लेखनामागील भूमिका सांगितली. आपण सतत विद्यार्थी आहोत, जीवनातल्या प्रत्येक अनुभवात आपण स्वत:ला तपासत गेलो. आत्मकथनाच्या माध्यमातून स्वानुभव व्यक्त होताना त्यात अहंकार येणार नाही याचीही काळजी घेतली आणि गरिबीची वर्णने करताना सहानुभूती मिळविण्याचा प्रयत्न होऊ नये याचीही खबरदारी घेतली, असे ते म्हणाले. यावेळी संजयशास्त्री दर्यापूरकर यांचेही भाषण झाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कवी इंद्रजित भालेराव यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन भालचंद्र देशपांडे धानोरकर यांनी केले. बालभवन वाचनालयाच्यावतीने ज्ञानोबा मुंडे यांनी उपस्थित मान्यवरांचे शाल, श्रीफळ व पुस्तक भेट देऊन स्वागत केले. बी. रघुनाथ महोत्सवाचे हे बारावे वर्ष आहे.