महाराष्ट्रात आत्महत्या खूप झाल्या; पण आता तसं करू नका. कर्तृत्वानं इतिहास जागता ठेवलात तसं आपलं आयुष्य फुलवा, असे आवाहन महाराष्ट्र भूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी केले.
ते महाड तालुक्यातील वरंध येथील रामदास पठाराखालील असलेल्या संशोधित शिवथरघळ परिसरात गुरुवारी दासनवमीच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात बोलत होते. राज्यात आत्महत्येचे प्रमाण वाढले आहे. सशक्त समाजासाठी ही चांगली गोष्ट नाही. आत्महत्या करू नका. छत्रपती शिवाजी महाराज, संत नामदेव, संत तुकाराम यांनी आपल्याला आत्महत्या करायला नाही सांगितले, तर संकटांशी दोन हात करण्याची शिकवण दिली. कर्तृत्ववान असणारे हे शरीर फुकट दवडू नका, असा मौलिक सल्ला पुरंदरे यांनी दिला. या वेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष कोकण साहित्य पुरस्कारप्राप्त साहित्यिक प्रभाकर भुस्कुटे, राजिपच्या अर्थ व बांधकाम सभापती चित्रलेखा पाटील, ज्येष्ठ इतिहासतज्ज्ञ पांडुरंग बलकवडे, स्नेहल प्रकाशनचे रवींद्र घाटपांडे, प्रतापराव टिपरे, गणेशनाथ महाराज संस्थानचे प्रमुख अरिवदनाथ महाराज आदी उपस्थित होते. अलिबागच्या गायिका कला पाटील यांच्या आनंदभुवनी या ऑडिओ सीडीचे प्रकाशन बाबासाहेब पुरंदरे यांच्या हस्ते झाले. इतिहासतज्ज्ञ पांडुरंग बलकवडे यांनी आपल्या भाषणात इतिहास उलगडला. या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र, गुजरात, उत्तर प्रदेशमधून अनेक साधक व दास उपस्थित होते.