धर्माबाद तालुक्यातल्या बाभळी बंधाऱ्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने आंध्रप्रदेशची याचिका फेटाळल्यानंतर धर्माबाद व परिसरात जल्लोष करण्यात आला. न्यायालयाच्या निकालामुळे धर्माबाद व परिसरातील तालुक्याचे हरितक्रांतीचे स्वप्न पूर्ण होण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. धर्माबाद तालुक्यात गोदावरी नदीवर बाभळी येथे २.७४ टीएमसी साठवण क्षमतेचा बाभळी बंधारा बांधण्यास तत्कालीन पालकमंत्री डॉ. माधव किन्हाळकर यांनी मुख्यमंत्री शरद पवार यांच्याकडे पाठपुरावा केला. पवार यांनी बंधाऱ्याला मान्यता दिली. त्यानंतर युतीचे सरकार आले व बंधाऱ्याचे काम रखडले. सन १९९५मध्ये मान्यता मिळालेल्या बंधाऱ्यास ४ वर्षांनंतर (१९९९) राज्यात आघाडीचे सरकार आल्यावर निधी मिळावा, या साठी पाठपुरावा झाला. त्यास २००४ मध्ये यश मिळाले.