आगळेवेगळे आंदोलन करण्यासाठी ओळखले जाणारे अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी बुधवारी विधिमंडळ परिसरात स्वत: तीन चाकी सायकल चालवून अपंगांच्या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधून घेतले. यासंदर्भात कडू यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अपंगांच्या शिष्टमंडळासह भेट घेतले.
हट के आंदोलन करणारे आमदार म्हणून बच्चू कडू ओळखले जातात. कधी पाण्याच्या टाकीवर चढून, तर कधी खोल विहिरीत उतरून सरकार आणि प्रशासनाला जेरीस आणण्याची त्यांची हातोटी आहे. बुधवारीही आ. कडू हे इतर अपंगांसह स्वत: तीन चाकी सायकल चालवत विधिमंडळ परिसरात पोहोचले आणि सर्वाच्या नजरा या अनोख्या आंदोलनाकडे वळल्या.
अपंगांना दर महिन्याला ६०० रुपये बेरोजगार भत्ता मिळतो. मात्र, महागाईचे वाढलेले प्रमाण लक्षात घेता हा भत्ता वाढवून ४००० रुपये करण्यात यावा. बेघर अपंगांसाठी घरकुल योजना १०० टक्के अनुदानावर राबविण्यात यावी व ही योजना राबविताना कोणत्याही प्रकारची अट अपंगांकरिता ठेवण्यात येऊ नये. अपंगांचा समावेश दारिद्रय़रेषेखालील यादीत व्हावा. समाजातील विविध घटकांसाठी वेगवेगळे मतदारसंघ आरक्षित करण्यात आले आहे आणि त्यांचे प्रतिनिधी विधान परिषदेवर घेण्यात येतात. त्याच धर्तीवर अपंगांसाठीही मतदारसंघ राखून ठेवण्यात यावा व त्यांना विधान परिषदेत प्रतिनिधित्व द्यावे, असे कडू यांनी यावेळी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
अपंगांच्या अनेक समस्या आहे. तीन चाकी सायकल चालवणे व आपली कामे करणे हे अपंगांसाठी अत्यंत कठीण काम आहे. त्यांच्या अडचणींचा अनुभव घेण्यासाठी मी स्वत: ही सायकल चालवून बघितली. माझ्यासारख्या धडधाकट माणसालाच जर एवढे कष्ट पडत असतील तर अपंगांना किती त्रास होत असेल,ह्व असे कडू म्हणाले.