अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी

मुंबई-गोवा महामार्गासह जिल्ह्य़ातील सर्व प्रमुख रस्त्यांची सध्या मोठय़ा प्रमाणात दुरवस्था झाली आहे. भरमसाट खड्डय़ांमुळे रस्त्यावरून प्रवास करणे जिकिरीचे ठरत आहे. खराब रस्ते अपघातांना कारणीभूत ठरत आहेत. यात अनेकांना जीव गमवावा लागला आहे. रस्त्यांच्या या दुरवस्थेला कारणीभूत असणाऱ्या कंत्राटदार, ठेकेदार आणि महामार्ग प्राधिकरण आणि बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांविरोधात फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी आम आदमी पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक कार्यालयात लेखी निवेदन देऊन ही मागणी करण्यात आली आहे.

मुंबई-गोवा महामार्गाच्या पळस्पे ते इंदापूर रस्त्याचे रुंदीकरण सध्या सुरू आहे. मात्र निकृष्ट दर्जाच्या कामामुळे महामार्गावर भरमसाट खड्डे पडले आहे. या खड्डय़ांमुळे वाहनचालकांना गाडी चालवणे कठीण होऊन बसले आहे. दुचाकीचालकांसाठी महामार्गाला पडलेले खड्डे जिवघेणे ठरत आहेत, तर नादुरुस्त रस्त्यांमुळे प्रवाशांना पाठदुखी, मानदुखी, कंबरदुखी यांसारख्या आरोग्यविषयक समस्या निर्माण होत आहेत. महामार्गावर दिवसागणिक होणाऱ्या अपघातांना रस्त्याची दुरवस्था कारणीभूत आहे. त्यामुळे महामार्ग प्राधिकरण आणि संबंधित ठेकेदार यांच्याविरोधात फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी आम आदमी पक्षाच्या दिलीप जोग यांनी केली आहे.

रस्त्याची कामे करताना मात्र कामाचे मूळ निकष पाळले जात नाहीत, शास्त्रीय तपासणी न करताच साहित्यवापर केला जातो. रस्त्याची कामे सुरू असताना अधिकारी उपस्थित राहत नाहीत. केलेल्या कामांची तपासणी न करता परस्पर बिले अदा केली जातात. यामुळे शासकीय निधीचा अपव्यय होतो आणि रस्त्यांची दुरवस्था कायम राहते. त्यामुळे संबंधित अधिकारी आणि ठेकेदार यांच्यावर शासनाची फसवणूक करणे, शासकीय निधीचा अपव्यय करणे, प्रवाशांच्या मृत्यूस कारणीभूत ठरणे, शारीरिक हानी होण्यास कारणीभूत ठरणे, वाहनांची हानी घडवणे यांसारख्या आरोपांखाली फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावेत अशी मागणी आम आदमी पक्षाच्या दिलीप जोग यांच्या वतीने करण्यात आली आहे.