पनवेल- माथेरान रस्ता सध्या प्रशासकीय उदासिनतेच्या गत्रेत अडकला आहे. तब्बल चार दशकांपासून या रस्ताचे काम रखडले आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे आता रस्ते नियोजनाच्या आराखडय़ातून हा रस्ता नाहीसा झाला आहे.

माथेरानसाठी पर्यायी मार्ग असावा अशी  मागणी १९५०च्या दशकात पुढे आली होती. यासाठी पनवेलमाग्रे माथेरानला येणारा रस्ता प्रस्तावित केला गेला.  १९६१  ते १९८१ या वीस वषार्ंच्या रस्ते नियोजनात पहिल्या क्रमांकावर पनवेल माथेरान रस्त्याचा समावेश करण्यात आला.

तीस  किलोमीटर लांबीच्या या रस्त्यासाठी आवश्यक तरतूद  करण्यात आली. तत्कालिन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते या रस्त्याची कोनशीला समारंभ पार पडला.

मात्र रस्त्याचे कामही सुरु झाले. पनवेल ते धोदाणी मार्गपुर्ण करण्यात आला. मात्र धोदाणी ते माथेरान हा जेमतेम पाच किलोमिटरचा घाटरस्ता अपुर्ण राहिला. आज या घटनेला चार दशके लोटली आहे. मात्र रस्त्याचे काम पुर्ण झालेले नाही.

विशेष म्हणजे १९६१ ते १९८१ या वीस वर्षांंसाठी राज्याच्या रस्ते नियोजनात समावेश असलेला हा रास्ता १९८१ ते २००१ आणि २००१ ते २०२१ या चाळीस  वर्षांंसाठीच्या रस्ते नियोजनातून गायब झाला.

आता रस्ते नियोजनात या मार्गाचा समावेष नसल्याने हे काम करणे शक्य होत नाही. या संदर्भातील कोणतेही स्पष्टीकरण शासन स्तरावर उपलब्ध नाही.

या रस्त्यामुळे माथेरान हे पनवेल, नवी मुंबई आणि मुंबईशी जोडले जाणार होते. यामुळे मुंबई नवी मुंबईतून येणाऱ्या पर्यटकांच्या वेळेची बचत होणार आहे. तर नेरळ -माथेरान दरम्यानच्या अरुंद रस्त्यावरील वाहतुकीचा भार कमी होण्यास मदत होणार आहे. या रस्त्यामुळे धोदानी, देहरंग, मालडूंगे आणि वाघाची वाडी या आदिवासी वाडय़ा जोडल्या जाणार आहेत. त्यामुळे  या आदिवासी वाडय़ांचा विकास होण्यास मदत होणार आहे.

माथेरानकर  आणि धोदानी परिसरातील आदिवासींनी याबाबत शासनस्तरावर अनेकदा पाठपुरावा केला आहे. रस्त्याच्या मागणीसाठी २००८ मध्ये माथेरानकरांनी श्रमदानातून रास्ता करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र पर्यावरण संवर्धनाचा मुद्दा पुढे करून या कामास अटकाव करण्यात आला.

माथेरानला जोडणारा पर्यायी मार्ग असावा ही माथेरानकरांची दोन दशकांची मागणी आहे. पण शासनस्तरावर याबाबत कमालीची उदासिनता आहे. माथेरान हे जागतिक दर्जाचे पर्यटनस्थळ आहे.

दरवर्षी येथे लाखो देशी- विदेशी पर्यटक येत असतात. ही बाब लक्षात घेऊन  पनवेल- माथेरान मार्ग होणे गरजेचे असल्याचे मत नगरसेवक संतोष पवार यांनी सांगीतले.