सार्वजनिक बांधकाम खात्याच्या सावंतवाडी विभागाच्या वतीने आंबोली या पर्यटनस्थळी लाखो रुपयांच्या कामांच्या निविदा निघूनही कामे निकृष्ट दर्जाची  झाली आहेत. आंबोलीत सार्वजनिक बांधकाम खात्याच्या विश्रामगृहावर एकाच वर्षांत सात वेगवेगळ्या निविदा काढूून लाखो रुपये खर्च दाखविला आहे. त्यात व्हीआयपी कक्षाच्या नूतनीकरणासाठी वेगवेगळ्या निविदा काढून विक्रमी खर्चाची नोंद केली आहे. विश्रामगृहासाठी सात स्वतंत्र निविदा काढून २८ लाख ६९ हजार ७०७ रुपये खर्च दाखविला आहे.
आंबोली पर्यटनस्थळ, सावंतवाडी पोलीस ठाण्याच्या निवासी रूम्सवर सार्वजनिक बांधकाम खात्याने केलेल्या कामकाजाबाबत संशय असल्याने आरटीआय कार्यकर्ते डी. के. सावंत यांनीही माहिती मागविली असता एकाच वर्षांत १२० प्रकरणांत पाच लाखाच्या खालील निविदा मंजूर करून खिरापत वाटप केल्याचे दाखविले. मात्र अनेक कामे होण्यापूर्वीच रक्कम खर्ची घातल्याचा संशय आहे.
सार्वजनिक बांधकाम खात्याने १ एप्रिल २०१२ ते ३१ मार्च २०१३ पर्यंतची माहिती डी. के. सावंत यांना दिली. ही माहिती देण्यास विलंब लावताना अपुरीही आहे असे सावंत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
आंबोली विश्रामगृहाची विशेष दुरुस्ती करणे, व्हीआयपी कक्षाचे नूतनीकरण या सदराखाली मजूर संस्थाना कामे दिली आहेत. सात जणांना हे कंत्राट दिले आहे. एकाच व्हीआयपी कक्षाच्या नूतनीकरणावर सात ठेकेदारांना कामे वाटप करून २८ लाख ६९ हजार ७७७ रुपये खर्च दाखविले आहेत.
आंबोली व्हीआयपी सूटच्या नूतनीकरणासाठी खर्च घालण्यात आले, त्यात अनुक्रमे श्रीदेव महापुरुष संस्था ३ लाख ५९ हजार ५५८ रुपये, तुळजा भवानी संस्था ४ लाख १८ हजार ७०६ रुपये व ४ लाख ४१ हजार १७४ रुपये, तसेच आंबोली विश्रामगृह नूतनीकरण व सुशोभीकरण नावाखाली दोन निविदा काढल्या. त्या मीनल पटेल यांना अनुक्रमे ४ लाख ९९ हजार ५५५ व ३ लाख ३४ हजार ४९२ रुपये तर आंबोली विश्रामगृह छप्पर दुरुस्ती आर्यदुर्ग संस्था ४ लाख ३६ हजार २४२ रुपये आणि आंबोली विश्रामगृह सुधारणा नेरूर ग्रामोत्कर्ष संस्थेला काम दिले. त्यावर ३ लाख ३७ हजार ९८० रुपये खर्च दाखविले आहेत.
आंबोलीच्या विश्रामगृह व्हीआयपी सूट नूतनीकरण, दुरुस्ती व सुशोभीकरण अशा सात निविदा एकाच वर्षांत व तारखांना निघून खर्च दाखविला गेला आहे. त्याशिवाय विश्रामगृह सुधारणा व व्हीआयपी रस्ता सुधारणा करण्यासाठी ४ लाख ९३ हजार ९५४ रुपयांची निविदा काढली आहे, पण या रस्त्याची सुधारणाच झालेली नाही. त्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
आंबोली ते दाणोली या घाटरस्त्यावर पावसाळ्यात पडलेले खड्डे बुजविण्याासाठी लाखो रुपये खर्च घातले गेले, पण प्रत्यक्षात रस्त्यावरचे खड्डेच बुजलेले नाहीत. त्यामुळे पर्यटक, वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागला. हे खड्डे बुजविण्याचे कागदोपत्री दाखविण्यात आले आहे.
आंबोली कावळेसाद पॉइंटची सुधारणा करण्यासाठी ९ लाख ५७ हजार ५४१ रुपये खर्च झाला आहे. आंबोली महादेवगड रस्ता रिटेंनिग वॉलचे बांधकाम करण्याचा ठेका ६ लाख ५९ हजार ४८४ रुपयांचा होता, पण काम पूर्ण झाले तेव्हा ही रक्कम ९ लाख  ९८ हजार ३५६ रुपये एवढी होत आहे. या वॉलचे मोजमापही संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहे.
आंबोली कावळेसाद पॉइंट व महादेवगड पॉइंट येथे टॉयलेट ब्लॉकचे बांधकाम करण्याचे काम १६ लाख ६० हजार ६७८ रुपये एवढय़ाच किमतीचे २६ मार्च २०१२ ला ठेकेदाराला दिले गेले. हे काम २९ सप्टेंबर २०१३ रोजी पूर्ण होण्याची तारीख निश्चित केली गेली. पण सार्वजनिक बांधकाम खात्याने कामाची सद्यस्थिती माहिती अधिकारात उघड केलेली नाही.
आंबोलीच्या सार्वजनिक बांधकाम खात्याच्या विश्रामगृहावर गेल्या पाच ते दहा वर्षांत खर्च पडलेली रकमेचा ताळमेळ घातला गेल्यास नवीन विश्रामगृह बनेल. या विश्रामगृहावर लाखो रुपये खर्च घातला गेला असला तरी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमच निर्माण होतो. पिण्याच्या पाण्याकडे दुर्लक्ष करून दरवर्षी मे महिन्यात विश्रामगृह उपलब्ध करून दिले जात नाही.
आंबोलीत पर्यटनाच्या नावाखाली कोटय़वधी रुपये खर्ची घालण्यात आले, पण कामांचा निकृष्ट दर्जा पाहता सर्व कामांची चौकशी होण्याची आवश्यकता आहे, असे आरटीआय कार्यकर्ते डी. के. सावंत यांनी म्हटले आहे. सर्व कामांची गुणनियंत्रकामार्फत चौकशीची मागणी केली आहे.