उच्चवर्णीय मुलीशी प्रेमसंबंध ठेवल्याने खर्डा (ता. जामखेड) येथील दलित युवकाची शाळेतून उचलून नेऊन हत्या केल्याच्या राज्यभर गाजलेल्या प्रकरणातील पाच आरोपींचे जामीनअर्ज शुक्रवारी येथील जिल्हा सत्र न्यायालयाने फेटाळले. यापूर्वी जामीन मिळालेल्या चौघांच्या आदेशाला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. त्याची सुनावणी अद्याप प्रलंबित आहे. मुख्य आरोपी सचिन उर्फ आबा हौसराव गोलेकर याने अद्याप जामिनासाठी अर्ज केलेला नाही.
पाच आरोपींचे जामीनअर्ज फेटाळण्यात आल्याचा आदेश जिल्हा सत्र न्यायाधीश व्ही. बी. कुलकर्णी यांनी दिला. शेषराव रावसाहेब येवले, नीलेश महादेव येवले, भुजंग सूर्यभान गोलेकर, सिद्धेश्वर विलास गोलेकर व विशाल उर्फ विकास हरिभाऊ ढगे यांनी गेल्या सप्टेंबर व ऑक्टोबरमध्ये जामिनासाठी अर्ज केले होते. त्यावर सुनावणी झाली. सरकारतर्फे जिल्हा सरकारी वकील सतीश पाटील, फिर्यादीच्या वतीने वकील झगडे व वकील सुपेकर यांनी सरकारी वकिलांना मदत केली तर आरोपींच्या वतीने वकील माणिकराव मोरे व वकील महेश तवले यांनी युक्तिवाद केला.
शाळेतील उच्चवर्णीय मुलीशी प्रेमसंबंध ठेवल्याच्या कारणातून या मुलीचे नातेवाईक व त्यांच्या मित्रांनी नितीन राजू आगे या १७ वर्षांच्या दलित युवकाची, दि. २८ एप्रिल २०१४ रोजी सकाळी ७.३० ते दुपारी ३.३० दरम्यान अत्यंत निर्घृणपणे हालहाल करून हत्या केली व नंतर त्याने गळफास घेतल्याचा बनाव रचला होता. या घटनेमुळे राज्यभर क्षोभ निर्माण झाला होता. अनेक संघटनांनी आंदोलनेही केली होती. एकूण १३ आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यात आले. त्यातील ३ आरोपी अल्पवयीन आहेत. तर विनोद गटकळ, राजकुमार गोलेकर, संदीप शिकारे व साईनाथ येवले यांचे जामीनअर्ज पूर्वीच सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केले, त्याविरुद्ध उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे.
वरील पाच जणांसाठी युक्तिवाद करताना आरोपींच्या वकिलांनी प्रामुख्याने पोलिसांच्या तपासातील त्रुटींकडे लक्ष वेधत जामीन देण्याची मागणी केली. गुन्हा दाखल करण्यात दिरंगाई झाली. प्रत्यक्ष साक्षीदार नाही. इतर साक्षीदारांचे जबाब एकसारखे आहेत. मुलीचा जबाब घेतला नाही. ओळखपरेड झाली नाही. गुन्हा दाखल करण्यापूर्वीच मरणोत्तर पंचनामा झाला. पोलिसांनी बनावट साक्षीदार तयार केले आदी मुद्दे मांडण्यात आले. जिल्हा सरकारी वकील पाटील यांनी सर्वोच्च न्यायालयाचे विविध निवाडे देत त्यास विरोध केला व प्रकरणाचे गांभीर्य, त्याचा समाजावर होणारा परिणाम, जामीन मिळाल्यास साक्षीदारांवर येऊ शकणारे दडपण, यापूर्वी चौघा आरोपींना जामीन मिळाल्यावर साक्षीदारांवर आणलेला दबाव त्यातून दाखल झालेला गुन्हा याकडे लक्ष वेधले.
‘द्रुतगती’ची घोषणा फसवीच!
नितीन आगेच्या हत्येने राज्यभर निर्माण झालेल्या जनक्षोभानंतर राज्य सरकारने हा खटला द्रुतगती न्यायालयापुढे चालवला जाईल, असे जाहीर केले होते. परंतु त्यावर अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नाही. दोषारोपपत्र दाखल झाले, मात्र खटला सुनावणीच्या प्रतीक्षेत आहे. त्यापूर्वी सोनई येथे उच्चवर्णीय मुलीच्या प्रेमप्रकरणातूनच झालेल्या दलित युवकांच्या तिहेरी हत्याकांडाच्या खटल्याची सुनावणी, जिल्ह्य़ाबाहेरील नाशिक येथील न्यायालयात सुरू झाली आहे. आता जवखेडे प्रकरणातील दोषारोपत्रही लवकरच दाखल होणार आहे.