पालकमंत्री राम शिंदे यांच्या कार्यालयावर हल्ला करून मोडतोड आंदोलन करण्यात सहभागी असलेल्या संभाजी ब्रिगेड संघटनेच्या अटक केलेल्या संपत दिनकर नागरगोजे व मनोज वसंत कोंडके या दोघांचीही न्यायालयाने आज, गुरुवारी जामिनावर मुक्तता केली. दरम्यान, आंदोलनात सहभागी असलेले सर्वच कार्यकर्ते उद्या, शुक्रवारी पोलिसांसमोर हजर होणार असल्याचे संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजेश परकाळे यांनी एका प्रसिद्धिपत्रकाद्वारे सांगितले.
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यास विरोध करण्यासाठी संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी दोन दिवसांपूर्वी शिंदे यांच्या सावेडी भागातील संपर्क कार्यालयावर दगडफेक करत कार्यालयाची मोडतोड केली होती. त्यातील मनोज कोंडके याला मंगळवारी रात्री अटक करण्यात आली होती, त्याला आजपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश होता. त्यानंतर बुधवारी रात्री नागरगोजे याला अटक करण्यात आली. दोघांची न्यायालयाने जामिनावर मुक्तता केल्याची माहिती तपासी अधिकारी, तोफखाना पोलीस ठाण्याचे निरीक्षक मोरे यांनी दिली.
दरम्यान, परकाळे यांनी आज पत्रक प्रसिद्धीस देऊन सर्व कार्यकर्ते उद्या पोलिसांसमोर हजर होणार असल्याचे कळवले आहे.