लातूरच्या जयमल्हार खंडोबा देवस्थान यात्रेनिमित्त मल्हार उत्सवामध्ये आयोजित कुस्ती स्पध्रेत पुणे येथील पहिलवान बालाजी झरे यांनी मल्हार केसरी किताब पटकावला. प्रतिस्पर्धी भरत कराडवर एक गुणाने मात करीत झरे यांनी हे यश साजरे केले.
प्रा. क्षीरसागर यांचा पठ्ठा पहिलवान भरत कराड यांना अंतिम कुस्तीत उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. तब्बल ४० मिनिटे कुस्ती चालली. दोन्ही पहिलवानांच्या डावपेचांनी कुस्तीप्रेमींची मने जिंकली. अंतिम सामना अनिर्णीत दिशेने चालला होता. पंचांनी अखेरच्या कुस्तीसाठी दोन्ही पहिलवानांच्या संमतीने पाच मिनिटांचा वेळ दिला. या अतिरिक्त वेळेत पहिलवान झरे यांनी चपळाईने लातूरच्या भरत कराडवर मात करीत एक गुण कमावला व मल्हार केसरीवर नाव कोरले.
झरे यांना मल्हार केसरी चषक, रोख रक्कम व गुरुमूर्ती कोळ्ळे स्मरणार्थ ११ तोळे चांदीचे कडे देऊन गौरविण्यात आले. छत्रपती पुरस्कारविजेते शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या स्पध्रेत १०५ मल्लांनी सहभाग घेतला. या वेळी १० रुपयांपासून ७ हजार रुपयांपर्यंत किताबाच्या कुस्त्या झाल्या. काकासाहेब पवारांचे पठ्ठे पहिलवान देवानंद पवार, पंकज पवार यांच्यासह लातूर येथील प्रा. क्षीरसागर यांच्या मल्लांनी आपले कौशल्य दाखवून आखाडा गाजवला. अशोक भोसले, प्रा. ईश्वर बिराजदार, अरुण हलकुडे यांनी पंच म्हणून काम पाहिले.