शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आज शहरात ठिकठिकाणी शिवसैनिक एकत्र झाले. रविवारी बाजारपेठेत सुटीचा दिवस, पण एरवी उघडी असणारी दुकानेही आज बंद ठेवण्यात आल्याने शहरात शुकशुकाट होता. सायन्स कोर मैदानावर सुरू असलेल्या देवकीनंदन ठाकूर यांच्या भागवत कथेदरम्यान देखील बाळासाहेब ठाकरे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. शहरातील राजकमल चौकात अनेक शिवसैनिक एकत्र आले होते. मुख्य बाजारपेठेतील बहुतांश दुकाने बंद होती, काही दुकानदारांनी दुकाने उघडण्याचा प्रयत्न केला, पण शिवसैनिकांनी त्यांना दुकाने बंद करण्याचे आवाहन केले. त्यामुळे मुख्य बाजारपेठेत शुकशुकाट पसरला होता. चौकांमध्ये बंदोबस्त वाढवण्यात आला होता. पोलिसांची गस्तदेखील वाढली होती. विद्यापीठ चौक, सायन्स कोर मैदान, राजकमल चौक येथे बाळासाहेब ठाकरे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. अमरावती शहरातील शिवसेनेचे प्रमुख नेते अंत्यसंस्कारासाठी मुंबईत असल्याने दुसऱ्या फळीतील शिवसैनिकांनी आपल्या लाडक्या नेत्याला श्रद्धांजली वाहण्यासाठी ठिकठिकाणी सभा घेतल्या. अनेक रस्ते निर्मनूष्य झालेले दिसले.
बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनाचे वृत्त पसरताच काल सायंकाळी राजकमल चौक, जयस्तंभ, जवाहर रोड परिसरातील दुकाने बंद करण्यात आली होती. अंत्यसंस्काराला उपस्थित राहता यावे यासाठी अनेक शिवसैनिकांनी बडनेरा रेल्वे स्थानकावर धाव घेतली होती. आज शहरात सुमारे दीड हजार पोलिसांचा ताफा ठिकठिकाणी तैनात करण्यात आला होता. पोलीस आयुक्त अजित पाटील, उपायुक्त सुरेश साखरे, संजय लाटकर यांच्यासह इतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनीही गस्त घातली. चंद्रपूर -शिवसेना सुप्रीमो बाळासाहेब ठाकरे यांना श्रध्दांजली म्हणून शहरातील बाजारपेठ बंद ठेवण्यात आली. तसेच जिल्हा शिवसेनेच्या वतीने शहरातील मुख्य चौकात ठिकठिकाणी शोकसभा व श्रध्दांजली कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. गांधी चौकातील गोल बाजार, शिवसेनेचे वर्चस्व असलेल्या बंगाली कॅम्प, तुकूम, दुर्गापूर येथील बाजार बंद झाला. जटपुरा गेट व गांधी चौकात बाळासाहेब ठाकरे यांचे मोठे कटआऊट लावून श्रध्दांजली वाहण्यात आली. जिल्हय़ातील शिवसेना नेते व कार्यकर्ते साहेबांच्या निधनाने दु:खात अखंड बुडाले होते. जिल्हाप्रमुख बाळू धानोरकर, रमेश देशमुख, उपमहापौर सदीप आवारी, रमेश तिवारी, दिलीप कपूर यांनी अंतिम दर्शनासाठी मुंबईच्या दिशेने धाव घेतली.
आज सकाळी शिवसेनेच्या वतीने गांधी चौक, जटपुरा गेट, बंगाली कॅम्प, तुकूम, दुर्गापूर येथे सर्वपक्षीय श्रध्दांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यात मनोज पाल, अनिल वनकर, माजी नगरसेविका भरडकर यांच्यासह शिवसेनेचे स्थानिक नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते, भाजपचे नगरसेवक अनुप पोरेड्डीवार तसेच काँग्रेस व राष्ट्रवादीचे पदाधिकारी हजर होते. जटपुरा गेट येथे दीपक बेले यांनी कार्यकर्त्यांसह बाळासाहेबांना श्रध्दांजली दिली. यानंतर आज दुसऱ्या दिवशीही शहरातील व्यापारपेठ संमिश्र बंद होती.
बुलढाणा – शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अखेरचा निरोप देण्यासाठी आज संपूर्ण बुलढाणा जिल्हा स्वयंस्फूर्त बंद होता. जिल्ह्य़ातील तेराही तालुक्याची मुख्यालय असलेली शहरे व प्रमुख गावांमध्ये शोककळा पसरलेली होती. जिल्हा मुख्यालयासह तालुका मुख्यालयी चौका चौकात शिवसेनाप्रमुखांच्या प्रतिमांपुढे श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. स्थानिक पत्रकार भवनात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना पत्रकारांच्या वतीने भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. यावेळी पत्रकारांनी बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा दिला. पत्रकार व मान्यवर बाळासाहेबांच्या आठवणीने शोक विव्हळ झाले होते. जिल्हाभर शांतता होती. पोलीस बंदोबस्त चोख होता.
यवतमाळ – बाळासाहेब ठाकरे यांच्या निघनाबद्धल शोक व्यक्त करण्यासाठी जिल्ह्य़ात बंद पाळण्यात येऊन बाळासाहेबांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. नेर शहरात बारी चौकात आयोजित श्रद्धांजली सभेत परमानंद अग्रवाल,सुघाकर तायडे, पवन जयस्वाल, बाबू पाटील, स्नेहल भाकरे,भाऊराव ढवळे, राजू चिरडे, विविध पक्ष नेत्यांनी बाळासाहेब ठाकरे यांना श्रद्धांजली वाहिली. पुसदच्या सुभाष चौकात श्रद्धांजली सभा घेण्यात आली व शहरातून एक रॅली काढण्यात आली. आर्णी, महागाव, घाटंजी,आर्णी, वणी, दारव्हा, दिग्रस, राळेगाव, यवतमाळ, उमरखेड, कळंब शहरांतील नागरिकांनी शोक व्यक्त केला. सेना खासदार भवना गवळी, आमदार संजय राठोड यांच्यासह असंख्य नेते व कार्यकत्रे बाळासाहेब ठाकरे यांच्या अंत्य दर्शनासाठी मुंबईला गेले आहेत.
वर्धा- शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनाबद्दल आज सर्वत्र शोकमय वातावरण होते. बाळासाहेबांना श्रध्दांजली वाहण्यासाठी संपूर्ण जिल्ह्य़ात बंद पाळण्यात आला. एरव्हीच्या राजकीय पक्षांच्या बंदपेक्षा आज पाळण्यात आलेला बंद न भूतो न भविष्यती अशा स्वरूपात दिसून आला.सकाळपासून एकही दुकान वध्र्यात उघडले नाही. पेट्रोलपंप, सामान्य रुग्णालय, वृत्तपत्रांची स्थानिक कार्यालय वगळता सर्वत्र शुकशुकाट होता.
लोकांची दिवसभर वर्दळ राहणाऱ्या पानटपऱ्या बंद राहल्याने बंदची उत्स्फू र्तता प्रामुख्याने दिसून आली. रविवारी शहरात बाजाराचा दिवस असतो, पण शोकमय वातावरणाने कुणीही घराबाहेर पडला नाही. सेनेचे नगरसेवक मनोज रोकडे यांच्या प्रभागात श्रध्दांजलीचे फलक लावण्यात आले होते. एका घरापुढे मंडप घालून त्याठिकाणी बाळासाहेबांची प्रतिमा ठेवण्यात आली. भरगर्दीच्या याठिकाणी शेकडो लोकांनी श्रध्दांजली अर्पण केली. मावळयाचे गुणगाण करणाऱ्या पोवाडय़ांच्या आवाजाने वातावरण सेनामय झाले होते. कुठेही अनुचित प्रकार घडला नाही. जय महाकाली शिक्षण संस्थेत बाळासाहेबांना श्रध्दांजली वाहण्यात आली. संस्थाध्यक्ष शंकरप्रसाद अग्निहोत्री यांनी बाळासाहेबांना श्रध्दांजली वाहताना शब्दाचा पक्का नेता, सच्चा पत्रकार व मार्मिक व्यंगचित्रकार म्हणून त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर प्रकाश टाकला. सेना कार्यालयात शिवसैनिकांनी गर्दी केली होती. जिल्हाप्रमुख रविकांत बालपांडे यांच्यासह अनेक शिवसैनिक मुंबईत अंत्यदर्शनासाठी पोहोचले.
अकोला- शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनामुळे शहरातील बाजारपेठ रविवारी होती. संपूर्ण जिल्ह्य़ात शांतता आहे. शहरातील महात्मा गांधी मार्ग, टिळक मार्ग, कापड बाजार, जठारपेठ, गौरक्षण रोड, डाबकी रोड,दुर्गा चौक, जठारपेठ चौक, रतनलाल प्लॉट या भागातील बाजारपेठ तात्काळ बंद होती. शहरातील दुकानदारांनी स्वयंस्फूर्तीने ही बाजारपेठ बंद ठेवली. दरम्यान, काही ठिकाणी शिवसैनिकांनी शहरातील बाजारपेठेत फेरफटका मारल्याची माहिती मिळाली. अकोट, मूर्तिजापूर, तेल्हारा या शहरातील बाजारपेठ व रस्त्यावर शांतता होती.
वाशीम – शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना श्रध्दांजली अर्पण करण्यासाठी शिवसेनेच्यावतीने रविवारी जिल्ह्य़ात कडकडीत बंद पाळण्यात आला. या बंदमध्ये आरोग्यसेवा, औषधी दुकाने, बससेवा, रेल्वेसेवा यांना वगळण्यात आले होते. शहरासह जिल्ह्यातील प्रमुख गावातील रस्त्यावर शुकशुकाट होता याबंदमध्ये जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेते, पदाधिकारी, सर्वधर्मीय नागरिक, व्यापारी बांधव स्वयंस्फुर्तीने सहभागी झाले होते. जिल्ह्यात वाशीम, रिसोड, कारंजा (लाड), मंगरूळपीर, मालेगाव, मानोरा, कामरगाव, शेलुबाजार, अनसिंग, राजाकिन्ही, शिरपूर जैन येथील बाजारपेठ बंद होती. सर्वधर्मीय नागरिकांनी रविवारच्या बंदमध्ये स्वयंस्फूर्तीने सहभागी होऊन शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण केली.
श्रध्दांजली सभेला माजी राज्यमंत्री सुभाष ठाकरे, विठ्ठलराव गावंडे, प्रदीप पवार, सुनील मालपाणी, राजेश पाटील, ललितकुमार पाटील, अनिल गावंडे, विवेक नाकाडे, प्रकाश इंगोले, रमेश शिंदे, पुरुषोत्तम चितलांगे, प्रा वीरेंद्रसिंह ठाकूर आदी उपस्थित होते.