बत्तीस शिराळ्यात नागपंचमीनिमित्त आयोजित करण्यात येणाऱया नागांच्या विविध खेळांवर उच्च न्यायालयाने मंगळवारी बंदी घातली. सांगलीतील सर्पमित्रांकडून या खेळांवर बंदी घालण्याची मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. त्यावर मंगळवारी सुनावणी झाली आणि न्यायालयाने या प्रकारच्या खेळांवर बंदी घातली.
गेल्या काही वर्षांपासून सांगली जिल्ह्यातील बत्तीस शिराळा या गावामध्ये नागपंचमीच्या दिवशी नागांना खेळवले जाते. या दिवशी गावातून नागांची मिरवणूकही काढली जाते. सांगलीसह कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यातील अनेक लोक हे खेळ बघण्यासाठी या दिवशी बत्तीस शिराळ्यामध्ये येतात. मात्र, या खेळांसाठी नागपंचमीच्या आधीपासूनच नाग पकडले जातात. त्याचबरोबर खेळांच्या निमित्ताने त्यांच्या नैसर्गिक दिनक्रम बिघडवला जातो, असा आरोप सर्पमित्रांतर्फे करण्यात आला. तो ग्राह्य धरीत न्यायालयाने या खेळांवर बंदी घातली.