सोलापूर जिल्ह्य़ात गेल्या तीनचार दिवसांपासून वादळी वाऱ्यांसह होत असलेल्या अवकाळी पावसाचा फटका ठिकठिकाणी शेतीला व घरांना बसू लागला आहे. जिल्ह्य़ात जवळपास सर्व तालुक्यांमध्ये कमी-अधिक प्रमाणात वादळी वाऱ्यांसह अवकाळी पाऊस पडत आहे. शासनाच्या निकषानुसार नुकसान झालेल्या कुटुंबीयांना शासनाकडून मदत मिळणे अशक्य असल्यामुळे शेतक ऱ्यांपुढील अडचणी वाढल्या आहेत.
मोहोळ तालुक्यातील इंचगाव येथे तात्या दत्तू डोके व शशिकांत दत्तू डोके या बंधूंची केळीची बाग पार उद्ध्वस्त झाली असून त्यातून त्यांच्यावर मोठे आर्थिक संकट ओढवले आहे. डोके बंधूंनी आपल्या मालकीच्या दहा एकर क्षेत्रापैकी दीड एकर क्षेत्रात केळीची बाग तयार केली होती. केळीचे पीक तयार होऊन बाजारात जाण्यासाठी सज्ज झाले असतानाच अचानकपणे वादळी वाऱ्यांसह अवकाळी पाऊस होऊन त्यात संपूर्ण केळीची बाग उद्ध्वस्त झाली. यात सुमारे पाच ते सहा लाखांचे नुकसान झाले. केळी व उसाच्या पिकासाठी डोके बंधूंनी स्टेट बँक ऑफ इंडियाकडून गेल्या फेब्रुवारीत चार लाखांचे कर्ज काढले होते. हे कर्ज आता कसे फेडायचे, याची विवंचना त्यांना सतावत आहे. शेतीशिवाय उदरनिर्वाहाचे दुसरे साधन नाही. डोके कुटुंबीय आठ जणांचे आहे. त्यांच्यासमोर रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे.
इंचगावासह शेजारच्या बेगमपूर, औंढी, देगाव, अर्धनारी, अरगोळी आदी गावांतील पिकांना विशेषत: केळीच्या बागांना अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. किमान शंभर एकर केळी बागा उद्ध्वस्त झाल्याचा अंदाज शेतकरी व्यक्त करीत आहेत. पंढरपूर तालुक्यातील करकंब, भोसे आदी गावांना अवकाळी पावसाचा फटका सहन करावा लागला. करकंब येथे नागनाथ वंजारी यांची दीड एकर क्षेत्रातील बाग जमीनदोस्त झाली आहे. त्यामुळे वंजारी कुटुबीय हतबल झाले आहे. भोसे येथेही केळीच्या बागा उद्ध्वस्त झाल्या आहेत.
बार्शी, माढा, अक्कलकोट, उत्तर सोलापूर आदी तालुक्यांनाही अवकाळी पाऊस तथा वादळाचा फटका कमी-अधिक प्रमाणात बसला आहे. घरांवरील पन्हाळी पत्रे उडून गेल्यामुळे अनेक संसार उघडय़ावर पडले आहेत. शेतीबरोबरच घरांचे नुकसान झाले असताना शासनाच्या निकषात नुकसान भरपाई देता येत नाही. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकरी व इतरांसमोरील आर्थिक अडचणी वाढल्या आहेत.