दुष्काळी स्थितीत कर्जबाजारीपणातून शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे प्रमाण वाढत असतानाच जिल्हय़ात वेगवेगळय़ा बँकांनी वसुलीसाठी न्यायालयामार्फत शेतकऱ्यांना नोटिसा बजावल्या आहेत. एका बाजूला वसुली करू नका, वीज तोडू नका, असे सरकारचे आदेश असले, तरी त्याची अंमलबजावणी होत नसल्याने पैठण तालुक्यातील शेतकरी वैतागले आहेत. राष्ट्रीयीकृत व खासगी बँकांनी शेतकऱ्यांना या नोटिसा पाठविल्या आहेत. वसुलीच्या तगाद्याने शेतकरी पुरता हैराण झाला आहे.
मागील आठ दिवसांत पाठविण्यात आलेल्या या नोटिशांमुळे रक्कम कोठून भरायची, असा प्रश्न शेतकरी विचारत आहे. कर्जाच्या थकीत रकमेबाबत वाद असतानाही पिंप्रीराजा येथील शेतकऱ्यास नोटीस बजावण्यात आली. पाचोड व अन्य भागांतील अनेक शेतकऱ्यांनी आम्ही रक्कम कशी भरावी, अशी विचारणा सरकारकडे करण्याचे ठरविले आहे. या भागात मोसंबीच्या बागांना मोठय़ा प्रमाणात कर्ज देण्यात आले होते. दुष्काळी स्थितीमुळे बागा सुकून चालल्या आहेत. त्यातून किती उत्पन्न मिळणार व कसे कर्ज फेडणार, या विवंचनेत शेतकरी आहे.