बँकेच्या मुख्य शाखेतून बोलत असल्याचे सांगून एका अज्ञाताने सेवानिवृत्त व्यक्तिच्या बँक खात्यातून हजारो रुपये काढल्याची घटना धुळ्यात घडली. धर्मेद्र बडगुजर असे या व्यक्तिचे नाव असून त्यांच्या खात्यातून तब्बल ६९ हजारांची रक्कम काढण्यात आली. त्यांच्या मोबाइलवर कॉल करुन एसबीआयच्या मुख्य शाखेतून बोलत असल्याचे सांगत त्यांची फसवणूक करण्यात आली. फोन केल्यानंतर त्यांच्याकडून एटीएमचा पासवर्ड आणि अन्य गोपनिय माहिती काढून घेण्यात आली. धुळे जिल्ह्यातील शिरपूर शहरात ही घटना घडली असून बडगुजर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिरपूर शहर पोलिस ठाण्यात एका अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिरपूर शहरातील करवंद नाका परिसरात राहणारे धर्मेद्र बडगुजर या निवृत्ती वेतनधारक आहेत.

२२ जूलैला सायंकाळी ४ वाजता आणि त्यानंतर २३ जूलैला सकाळी एका अज्ञाताने बडगुजर यांच्या मोबाईलवर कॉल केला. अज्ञाताने बँकेतून बोलत असल्याचे सांगून त्यांच्याकडून आधार क्रमांक, बँकेतील बचत खाते क्रमांक आणि काही महत्वाची माहिती जाणून घेतली. त्यानंतर काही क्षणातच बडगुजर यांच्या खात्यातून ६९ हजार ९९६ रुपये कमी झाले. याप्रकरणी बडगुजर यांनी शिरपूर शहर पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोणतीही बँक फोनवरुन ग्राहकाच्या खात्यासंदर्भात माहिती विचारत नसते, हे माहित नसल्यामुळे त्यांच्यावर ही वेळ आली. या घटनेनंतर सर्वांनी  बँक खात्यासंदर्भात  दक्षता घेण्याची गरज आहे.