माजी मुख्यमंत्री बॅ. ए. आर. अंतुले यांच्या निधनाबद्दल मराठवाडय़ातील अनेक नेत्यांनी दु:ख व्यक्त केले. अंतुले यांच्या रुपाने विकासाची दृष्टी असणारा नेता काळाच्या पडद्याआड गेल्याची प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांनी व्यक्त केली.
१९८० ते ८२ या दोन वर्षांच्या काळात बॅ. अंतुले यांच्या मंत्रिमंडळात मराठवाडय़ातील एकमेव मंत्री म्हणून आपल्याला काम करण्याची संधी मिळाल्याची आठवण निलंगेकर यांनी सांगितली. कोकणातील सिंधुदुर्ग, मराठवाडय़ातील लातूर व जालना, तसेच विदर्भातील गडचिरोली या चार नव्या जिल्हय़ांची निर्मिती अंतुले यांच्या कार्यकाळात झाली. लातूर जिल्हय़ाच्या रौप्यमहोत्सवी कार्यक्रमासही ते आवर्जून उपस्थित होते.
सर्वधर्म समभाव जपणारा नेता
बॅ. अंतुले हे सर्वधर्म समभावावर विश्वास ठेवून काम करणारे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते होते. त्यांच्या निधनाने राज्याचे मोठे नुकसान झाले. अंतुले व लातूरकरांचा जिव्हाळा होता. लातूर जिल्हा निर्मितीत त्यांचे मोठे योगदान होते. विलासराव देशमुख व अंतुले यांचा कौटुंबिक जिव्हाळा होता. त्यांच्या निधनाने काँग्रेस पक्षाबरोबर देशमुख कुटुंबीयांचीही मोठी हानी झाली असल्याचे दिलीपराव देशमुख म्हणाले.
खैरेंनी जागविल्या आठवणी
औरंगाबाद – बॅ. अंतुले काँग्रेसचे मोठे व अभ्यासू नेते होते. शिवसेनाप्रमुखांशी त्यांची मैत्री होती. आपणाविरोधात निवडणूक लढवून ते पराभूत झाले, त्या वेळी त्यांनी माझे आवर्जून अभिनंदन केले होते, अशी आठवण खासदार चंद्रकांत खैरे यांनी सांगितली. अल्पसंख्याक समाजालाही सामाजिक न्याय विभागासारखा वस्तीसुधार निधी मिळावा. तसा प्रयत्न मिळाल्यास अंतुलेंना ती खरी श्रद्धांजली ठरेल, अशी भावना खासदार खैरे यांनी व्यक्त केली.
जालना जिल्ह्य़ाची निर्मिती
वार्ताहर, जालना
स्वतंत्र जालना जिल्ह्य़ाची निर्मिती करणारे मुख्यमंत्री म्हणून बॅ. अंतुले यांची आठवण पुढेही कायम राहणार आहे.
२१ जून १९४८ रोजी निजाम सरकारने तत्कालीन औरंगाबाद जिल्ह्य़ाचे विभाजन करण्याचा निर्णय घेऊन तसा आदेश गॅझेटमध्येही प्रकाशित केला होता. तत्कालीन औरंगाबाद जिल्ह्य़ातील जालना, अंबड, भोकरदन व जाफराबाद या ४ तालुक्यांचा स्वतंत्र जालना जिल्हा अस्तित्वात आणणारा हा निर्णय प्रत्यक्षात मात्र येऊ शकला नाही. कारण या निर्णयानंतर तीन महिन्यांतच हैदराबाद संस्थान निजामाच्या जोखडातून मुक्त झाले आणि स्वतंत्र जालना जिल्ह्य़ाची निर्मिती थांबली. त्यानंतर जालना भागातील नेतेमंडळी, सामाजिक कार्यकर्ते, विविध संघटना यांनी स्वतंत्र जिल्ह्य़ाची मागणी सुरूच ठेवली. अंतुले यांच्या घोषणेनुसार १ मे १९८१पासून स्वतंत्र जालना जिल्हा अस्तित्वात आला. तत्कालीन औरंगाबाद जिल्ह्य़ातील जालना, अंबड, भोकरदन व अंबड, तसेच परभणी जिल्ह्य़ातील परतूर या ५ तालुक्यांचा मिळून हा जिल्हा अस्तित्वात आला. २ मे १९८१ रोजी अंतुले यांच्या हस्ते जालना येथील जिल्हाधिकारी कार्यालयाचे उद्घाटन झाले. त्या दिवशी जालना शहरात नागरिकांनी रोषणाई करून आनंद साजरा केला. जिल्हा निर्मितीची घोषणा करण्याच्या काही महिने आधी अंतुले जालना येथे आले असता स्थानिक सर्वपक्षीय समितीने त्यांचा जाहीर सत्कार केला होता. या वेळी उपस्थित सर्वपक्षीय नेत्यांची स्वतंत्र जिल्हा निर्मितीच्या मागणीची अंतुले यांनी दखल घेतली आणि ३२ वर्षांपूर्वी जालना जिल्हा अस्तित्वात आला.