द्वारकापीठाचे शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांनी साईबाबा यांच्याविरोधात केलेले विधान हे निराधार आहे असे अखिल भारतीय आखाडा परिषदेने म्हटले आहे.
साईबाबांच्या अनुयायांनी त्यांच्या विधानाकडे दुर्लक्ष करावे असे परिषदेचे राष्ट्रीय प्रवक्ते बाबा हटयोगी यांनी शुक्रवारी रात्री वार्ताहरांना सांगितले. स्वामी स्वरूपानंद यांनी केलेली विधाने निराधार व गोंधळात टाकणारी आहेत असे ते म्हणाले.
साई बाबा संस्थान ट्रस्टचे माजी अध्यक्ष जयंत ससाणे यांनी साधूंची शिर्डी यात्रा घडवून आणली. नवी दिल्लीच्या काल्की पीठआचे अध्यक्ष प्रदीर कृष्णम यांनी सांगितले की, आम्ही लवकरच शंकराचार्याची भेट घेऊन त्यांना साईबाबांविषयीची विधाने मागे घ्यायला सांगून तसेच त्यांना शिर्डीत येण्याचे निमंत्रण देऊ.
स्वामी स्वरूपानंद यांनी एकोणीसाव्या शतकातील धार्मिक संत साईबाबा यांची पूजा करण्याला आक्षेप घेतला होता. त्यामुळे साईबाबा भक्तांमध्ये खळबळ उडाली व अनेकांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या होत्या. अनेक साईभक्तांनी मोर्चे काढून शंकराचार्याच्या वक्तव्याचा निषेध केला होता तसेच काहींनी त्यांच्यावर देशात विविध ठिकाणी गुन्हे दाखल केले होते.