वेगाने बदलणाऱ्या परिवर्तनाच्या आधुनिक जगात तथा २१ व्या शतकात आपण वावरत आहोत. पाश्चिमात्य संस्कृतीचे अंधानुकरण करीत आहेत. जुन्या बाबी -जुने संदर्भ निर्थक ठरविण्यात धन्यता मानताना आढळत आहेत. हे सर्वस्वी आत्मघातकी ठरते. आधुनिकता पचविण्यासाठी सर्वाना सदैव संत साहित्याचा आधार घ्यावाच लागेल असे स्पष्ट मत संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांचे वंशज, संत साहित्याचे गाढे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांनी व्यक्त केले. रविवारी (२ डिसेंबर) लोहाणा महाजनवाडी येथील प्रांगणात, ब्राह्मण सभा खोपोली आयोजित अभिनव व्याख्यानमालेमध्ये ‘संत साहित्य आणि आपण’ या विषयावर व्याख्यान देताना ते बोलत होते. आ. सुरेश लाड, नगराध्यक्ष मसुरकर, ब्राह्मण सभा खोपोलीचे अध्यक्ष नरेंद्र हर्डीकर, उपाध्यक्षा अनिषा बिवरे, माजी अध्यक्ष दीपक बाम, लोणावळा कॉलेजचे प्राचार्य डॉ. चंद्रशेखर भगत अन्य मान्यवर व मोठय़ा संख्येने महिला व पुरुष नागरिक याप्रसंगी उपस्थित होते.
१३ ते १८ दरम्यानच्या शतकांमध्ये संत साहित्याचे- मराठी भाषेतून दर्शन घडते असे सांगून डॉ. मोरे यांनी आपल्या अभ्यासपूर्ण भाषणांतून संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ, संत नामदेव, संत तुकाराम, संत गोरा कुंभार, संत चोखोबा, संत नरहरी सोनार, संत सावतामाळीसह अन्य संतांच्या साहित्य निर्मितीवर प्रकाशझोत टाकला. संतसाहित्यातील गुणवैशिष्टय़े सोदाहरण विशद केली. १८ पगडजातीतील या संतांच्या कालखंडात उच्चनीच जातपात असा भेदवाभ नव्हता. पेशवे काळात संतसाहित्यात परिवर्तन झाले. धाकटे बाजीराव पेशवे यांच्या काळात संतांनी जाती-जातीमध्ये निर्माण केलेल्या एकोप्यामध्ये फूट पाडण्यात आली. वर्णव्यवस्था लादली गेली. उच्चवर्णीय असलेले संस्कृत कवी मोरोपंत यांनी आपल्या कवितेतून त्याचा निषेध केल्याचे आढळते. आजमितीस आपण महिलांच्या सक्षमीकरणांची भाषा करतो, पण महिलांचे सक्षमीकरण १३व्या  शतकात संत ज्ञानेश्वरांच्या बहिणी मुक्ताबाई, जनाबाईच्या नेतृत्वातून आढळते. संत ज्ञानेश्वरांना  आपल्यातील संतत्वाचा परिचय करून देणारी मुक्ताबाईच होती अशी माहिती त्यांनी दिली.
कोणतीही संस्कृती मुख्यत्वेकरून भाषिक संस्कृती असते. भाषा संस्कृतीचे अधिष्ठान असते. भाषेतून पुढच्या पिढीत संक्रांत होते. मराठी भाषेच्या जडणघडणीचे मोलाचे काम संत ज्ञानेश्वरांनी केले. वारकरी संप्रदायाच्या इतिहासाचा पाया रचणारे, धर्मसंप्रदायाला प्रतिष्ठापना प्राप्त करून देण्यासाठी धर्मग्रंथ लिहिणारे संत ज्ञानेश्वर होते. संतांनी संस्कृतमधील तत्त्वज्ञानाच्या संकल्पना मराठी साहित्यात आणल्या. आपल्या कृतीने मराठी भाषा समृद्ध केली. मराठी माणसांची बोलण्याची, वागण्याची, राहण्याची पद्धत संतसाहित्यातून मिळते, असे डॉ. मोरे यांनी सोदाहरण निदर्शनास आणून दिले. नवीन महाराष्ट्र घडविणारे-वृत्तपत्रसृष्टीचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर, थोर साहित्यिक कै. र.वा. दिघे, न्यायमूर्ती रानडे, आगरकर, जोतिबा फुले, पहिले लावणीकार होनाजी-बाळा, बाळा-भैरू, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख गोळवलकर गुरुजी, लोकमान्य टिळक, लोकहितवादी, ब्रिटिश कालखंडातील प्रशासक विल्यम विल्सन हंटर, शिवरायांच्या कालखंडातील म्हाळजी शिंदे, रामजोशी इत्यादी मान्यवरांवर, संत साहित्याचा किती पगडा होता याची सोदाहरण माहिती त्यांनी दिली. काळ बदलला, लोक आता देवळात कमी जातात. तेव्हा संत साहित्यातील शिकवणीचा प्रचार-प्रसार प्रवचन व कीर्तनांतून करणाऱ्यांनी आता देवळात न बसता, व्याख्यानपद्धतीनुसार शाळा-महाविद्यालय व अन्य क्षेत्रांत जाऊन संतसाहित्यांचे दर्शन घडविण्याचा प्रयत्न करावा असे आवाहन डॉ. मोरे यांनी शेवटी केले. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते गणेश व परशुराम पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. स्वागत-प्रास्ताविक नरेंद्र हर्डीकर यांनी केले. व्याख्यातांचा परिचय पाठकसरांनी करून दिला. सूत्रसंचालन अनिलकुमार रानडे यांनी केले. आ. लाड, नगराध्यक्ष मसूरकर यांनी मनोगत व्यक्त केले. मिलिंद बोधनकर यांनी आभार मानले. राष्ट्रगीतानंतर व्याख्यानाची सांगता झाली.