राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना जपून बोलण्याचा सल्ला दिला आहे. ते सोलापूरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात ते बोलत होते. आघाडी सरकारच्या काळात अजित पवार यांनी शेतकऱ्यांना धरणातून करण्यात येणाऱ्या पाणीपुरवठ्यासंदर्भात बोलताना वादग्रस्त विधान केले होते. त्यामुळे अजित पवार यांना जोरदार टीकेला सामोरे जावे लागले होते. याबद्दल बोलताना अजितदादांनी म्हटले की, दुधाने तोंड पोळल्यामुळे माझ्यावर आता ताकही फुंकून पिण्याची वेळ आली आहे. त्यामुळे जिभेवर नियंत्रण ठेवा आणि काळजीपूर्वक बोला. कोणाच्या भावना दुखावणार नाहीत, याची काळजी घ्या, असा महत्त्वाचा सल्ला अजित पवारांनी यावेळी कार्यकर्त्यांना दिला. याशिवाय, आतापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गटा-तटाचे राजकारण खूप झाले. परंतु यापुढे असे राजकारण पक्षाला परवडणारे नाही. आता केवळ राष्ट्रवादी हा एकच गट पक्षात राहील. झालेल्या चुकांची दुरुस्ती करून पक्षात कोणालाही दुय्यम स्थान दिले जाणार नाही, अशी ग्वाहीदेखील अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना दिली. यानिमित्ताने अजितदादांनी राष्ट्रवादीअंतर्गत राजकारणात खासदार विजयसिंह मोहिते-पाटील गटाशी जुळवून घेण्याचे संकेतही दिले.