शिक्षण विभागाच्या निर्णयाने कोकणातील पर्यटन उद्योग अडचणीत येण्याची भीती
मुरुड दुर्घटनेत १४ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या मृत्यूनंतर रायगडच्या समुद्रकिनाऱ्यांकडे पर्यटकांनी पाठ फिरवलेली असून, समुद्रकिनाऱ्यांवर व उंच ठिकाणांवरील सहलींना बंदीचा निर्णय शिक्षण विभागाने घेतल्याने कोकणात पर्यटन व्यवसाय अडचणीत येण्याची भीती व्यक्त होत आहे.
पुण्यातील अबेदा इनामदार महाविद्यालयातील १२६ विद्यार्थी गेल्या सोमवारी सहलीसाठी मुरुड येथे आले होते. दुपारी जेवणानंतर यातील २० जण समुद्रात उतरले होते. मात्र पाण्याच्या प्रवाहाचा अंदाज न आल्याने हे सर्व जण बुडाले. यातील सहा जणांना वाचवण्यात यश आले. तर उर्वरितांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे रायगड जिल्ह्य़ातील समुद्र किनारे पर्यटनासाठी धोकादायक असल्याचा गरसमज निर्माण झाला आहे. त्यामुळे ऐन हंगामात पर्यटकांआभावी समुद्र किनारे ओस पडल्याचे चित्र सध्या पहायला मिळते आहे. अशातच आता राज्याच्या शिक्षण विभागाने शैक्षणिक सहलींसाठी समुद्रकिनारे आणि उंच ठिकाणे वज्र्य करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे पर्यटन व्यवसायिक चांगलेच धास्तावले आहेत. याचे दूरगामी परिणाम कोकणातील पर्यटन व्यवसाला भोगावे लागण्याची भीती व्यक्त केली जाते आहे. रायगड जिल्ह्य़ाात मुरुड बरोबरच काशिद, नागाव, अलिबाग, वरसोली, किहीम, दिवेआगर, श्रीवर्धन, आणि हरिहरेश्वर येथील समुद्र किनारे गेल्या काही वर्षांत पर्यटन केंद्र म्हणून नावारुपास आली आहेत. मुरुडच्या दुर्घटनेनंतर येथील पर्यटकांच्या संख्येत मोठी घट झाली आहे.

Untitled-10

समुद्रकिनाऱ्या सहली बंद करून पर्यटन थांबवणे चुकीचे आहे. रस्त्यावर अपघात होतात म्हणून रस्ते बंद करणार का? एखादी घटना घडली म्हणून असे सरसकट कोकणावर बंदी घालणे चुकीचे आहे. यामुळे कोकणाला रोजगाराच्या सर्वाधिक संधी देणारा पर्यटन व्यवसाय धोक्यात येईल.
– मानसी चेऊलकर, पर्यटन व हॉटेल व्यवसायिक

कोकणातील समुद्र किनारे सुरक्षित करण्याच्या दृष्टीने प्रयत्न होणे अपेक्षित असतांना, सहलींवर बंदी घालण्यासारखे निर्णय घेतले जात आहेत. या निर्णयाचा कोकणातील पर्यटन उद्योगावर नकारात्मक परिणाम होईल, शासनाने आपल्या निर्णय तातडीने मागे घ्यावा.
– अमित शिरगावकर, अध्यक्ष, लिबाग कृषी पर्यटन विकास संस्था