राजकीय वादातून महेंद्रवाडी येथे दोन गटांत  शनिवारी रात्री हाणामारी झाली. एकाला बांधून ठेवल्याची माहिती मिळताच पाटोदा ठाण्याचे पोलीस नाईक गोवर्धन मिसाळ गावात गेले असता जमावाने त्यांनाही झाडाला बांधून मारहाण केली. या प्रकरणी गुन्हे दाखल झाले असून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गावाला भेट दिली. पण गावातील सर्वच लोक फरार झाल्याने कोणालाही अटक झाली नाही.
 बीड लोकसभेसाठी गुरुवारी शांततेत मतदान झाल्यानंतर गावागावांत छोटय़ा-मोठय़ा कारणावरून तणाव निर्माण होत आहे. शनिवारी (दि. १९) रात्री पाटोदा तालुक्यातील महेंद्रवाडी येथे राष्ट्रवादीचे कार्यकत्रे अशोक नेमाने हे साडेआठच्या सुमारास गारमाथा येथे जीप चालकासह गेले होते. त्यावेळी उपसंरपच असलेले किशोर राजपुरे यांनी तू इथे का आला म्हणून वाद वाढविला. त्यातून मारहाण झाली. दोन्ही गटांत तुंबळ मारामारी झाल्यानंतर राजपुरे गटाने संतोष चव्हाण याला डांबून ठेवले. याची माहिती पाटोदा पोलिसांना कळताच पोलीस नाईक गोवर्धन मिसाळ गावात गेले. त्यांनी चव्हाण यांना जमावाच्या तावडीतून सोडविले. ते परत निघताना जमावाने पुन्हा हल्ला केला. त्यांनी मिसाळांनाही झाडाला बांधून मारहाण केली. अधिक कुमक मागविल्यानंतर मिसाळ यांची सुटका झाली. त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेनंतर गावातील पुरुष फारार झाल्याने सायंकाळपर्यंत कोणालाही अटक झाली नव्हती. ६० जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
वडवणीत वृद्धेचा खून
 वडवणी तालुक्यातील कोठरबण येथील बाबुराव सटवा कांगणे (वय ६०) यांचा शनिवारी रात्री अज्ञात लोकांनी डोक्यात दगड घालून खून केल्याची घटना उघडकीस आली. या प्रकरणी आरोपींना त्वरित अटक करावी या मागणीसाठी मृताच्या नातेवाईकांनी रविवारी सकाळी मृतदेह तहसील कार्यालयात आणला होता.