बीडचे जिल्हाधिकारी सुनील केंद्रेकर यांना कामावर रूजू होण्यास मंत्रालयातून अटकाव करण्यात आल्याच्या निषेधार्थ गुरुवारी बीड शहरात कडकडीत ‘बंद’ पाळण्यात आला. शहरातील सर्व बाजारपेठा, शाळा, महाविद्यालये, दुकाने उत्स्फूर्तपणे ‘बंद’ ठेवण्यात आली होती. शहरातील काही संघटनांच्या कार्यकर्त्यांनी केंद्रेकर यांना पाठिंबा देण्यासाठी मोर्चा काढला. बीड जिल्ह्यातील चौसाळा-नेकनूर आणि वडवणी तालुक्यातही सर्व कामकाज बंद ठेवण्यात आले.
भीषण दुष्काळात नियमांनी चालणारा अधिकारी अशी ओळख असणारे केंद्रेकर यांना प्रशिक्षणानंतर पुन्हा कामावर रुजू होण्यास मंत्रालयातून बुधवारी अटकाव करण्यात आला. प्रामाणिक अधिकारी नको, अशी भूमिका घेत बीडच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे तक्रारी केल्या. त्यास मुख्यमंत्र्यांनी मूकसंमती दिल्याने स्थानिक नेत्यांशी जुळवून घ्या, असा संदेश प्रशासनात गेला.
केंद्रेकर यांनी बीड जिल्ह्यातील टॅंकरचा घोटाळा, सेतू सुविधा केंद्राचे कंत्राट रद्द करण्याची शिफारस, आरटीओ कार्यालयातील दलालांना घरचा रस्ता दाखविल्याने सर्वसामान्यांना प्रशासनाकडून दिलासा मिळेल, असे वातावरण निर्माण केले होते. मात्र, केंद्रेकर यांना रुजू न होण्याचे आदेश आल्याने मराठवाड्यात आश्चर्य व्यक्त करण्यात आले. केंद्रेकर यांची बदली करू नये, अशी मागणी सर्वसामान्य बीडकरांनी केली आहे.