उन्हाळयाची चाहूल लागली आहे, सूर्य आग ओकू लागला आहे. वाढत्या उन्हामुळे जिल्ह्य़ात जलाशयातील पाणीसाठा झपाटय़ाने कमी होऊ लागला आहे. लघु व मध्यम प्रकल्प मिळून सर्व जलाशयात जेमतेम २४.५३ टक्के उपयुक्त साठा शिल्लक आहे. माजलगाव धरणात ३१.७३ टक्के साठा शिल्लक आहे.
गतवर्षीच्या तुलनेत या वर्षी जलाशयातील साठय़ाची स्थिती चांगली आहे. गेल्या ३-४ दिवसांपासून कडाक्याचे ऊन पडू लागल्यामुळे पाण्याचे बाष्पीभवन होऊ लागले आहे. परिणामी अनेक जलाशय कोरडेठाक पडू लागले आहेत. काही ठिकाणी पाणी पातळी जोत्याखाली आली आहे. बीड व परळी विभागांतर्गत गोदावरी, कृष्णा खोरे मिळून १४१ प्रकल्प आहेत. पकी १६ प्रकल्प मध्यम, तर १२५ लघु स्वरूपाचे आहेत. बीड विभागांतर्गत १०, तर परळी विभागात ६ मध्यम प्रकल्प आहेत. एकूण १४१ प्रकल्पांमध्ये २१६.६८ द.ल.घ.मी. साठा असून, त्याची टक्केवारी २४.५३ टक्के आहे. १२५ लघु प्रकल्पांपकी ४५ प्रकल्प कोरडे व जोत्याखाली आहेत. बीडच्या तुलनेत परळी विभागात पाण्याची स्थिती चांगली आहे. परळी विभागांतर्गत सहा मध्यम प्रकल्पांमध्ये वाण ८० टक्के, बोरणा ६८, बोधेगाव ८१, सरस्वती ७३, कुंडलिका ८० अशी पाण्याची टक्केवारी आहे.
वाघेबाभुळगाव येथील मध्यम प्रकल्प कोरडाठाक पडला आहे. परळी विभागातील पाण्याची टक्केवारी ७४ टक्के आहे. बीड विभागांतर्गत १० मोठय़ा प्रकल्पांपकी बीड येथील िबदुसरामध्ये १३.८५ टक्के, तर पाटोदा तालुक्यातील महासांगवी प्रकल्पात ४२.८० टक्के उपयुक्त साठा आहे. इतर आठ प्रकल्प कोरडेठाक आहेत.