मुंबई बॉम्बस्फोटांदरम्यान बेकायदेशीररित्या शस्त्रास्त्रे बाळगल्याप्रकरणी तुरूंगात शिक्षा भोगणा-या अभिनेता संजय दत्तला तुरूंगात बीअर आणि रम पुरवली जात असल्याचा खळबळजनक आरोप विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी शुक्रवारी केला. काही पोलीस अधिकारीच संजयला दारू पुरवत असल्याचेही ते म्हणाले.
सभागृहात कायदा व सुरक्षाव्यवस्थेवर चर्चा सुरू असताना भाजपचे ज्येष्ठ नेते असलेल्या तावडे यांनी हा आरोप केला. तसेच विधान परिषदेत नियम २६० नुसार राज्यातील महिलांवर वाढत चाललेल्या अत्याचाराबाबत दाखल केलेल्या प्रस्तावावरही ते बोलत होते. मे महिन्यापासून येरवडा तुरूंगात शिक्षा भोगणारा संजय दत्तला इतर कैद्यांपेक्षा वेगळी ट्रीटमेंट मिळत असल्याचा आरोप सर्वसामान्य नागरिकही करत आहेत. आत्तापर्यंत संजयला दोनदा पॅरोलवर सुट्टी मिळाली आहे. ऑक्टोबरमध्ये संजय संचित रजेवर तुरुंगाबाहेर आला होता व महिनाभर सुट्टी घालवून तो नोव्हेंबरमध्ये तुरूंगात परतला होता. या सुट्टीनंतर महिन्याभरातच त्याला पुन्हा ३० दिवसांची रजा मंजूर करण्यात आली. पत्नी मान्यता आजारी असल्याचे कारण देत संजयने पुन्हा सुट्टीसाठी अर्ज केला होता. सामान्य कैद्यांना सुट्टीसाठी वेगळा न्याय आणि व्हीआयपी कैद्यांना मात्र वेगळी वागणूक का मिळते, असा प्रश्न जनतेच्या मनात असतानाच आता संजयला तुरूंगात दारू मिळत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या आरोपावर आता गृहमंत्री आर. आर. पाटील सोमवारी काय उत्तर देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.