बेंबळे (ता. माढा, जि. सोलापूर) येथे शेतीच्या वादातून दारूतून विष पाजून जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. यातील मुलाचा मृत्यू झाला तर वडील दहा दिवसानंतर शुध्दीवर आल्यानंतर ही घटना उघडकीस आली. याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे.
अधिक माहिती अशी, रघुनाथ जानू जाधव (वय ५६ रा. बेंबळे ता. माढा) यांना दि. ७ जानेवारी रोजी सायंकाळी ७ वाजता संशयीत आरोपी दिनकर शंकर भोसले (रा. बेंबळे ता. माढा) याने अर्जून शेटे याचा सांगण्यावरून मी आज तुला स्वत:च्या पैशाने दारू पाजतो म्हणून दुचाकीवर नेले. बेंबळे येथील बिअर शॉपीतून दारू विकत घेऊन त्यात विषमिश्रित दारू जाधव यांना पिण्यास दिली. त्यातील थोडी दारू पिल्यानंतर जाधव यांना चक्कर येऊन ते बेशूध्द पडले. त्यानंतर भोसले याने अर्धी दारूची बाटली जाधव यांच्या खिशात ठेवून त्यांना त्यांचा घराजवळ असणाऱ्या कॅनलच्या जवळ आणून सोडले. वडील खूप दारू प्याले असतील म्हणून मुलांनी उचलून त्यांना घरी नेले.

दुसऱ्या दिवशी सकाळी ७ वाजता मुलगा सुनील जाधव यास दारूचे व्यसन होते. त्याने वडिलांच्या खिशातील उरलेली विषमिश्रित दारू प्राशन केली. त्यानंतर त्याच्या तोंडातून फेस येऊन पडल्याने त्याला व त्याचा वडिलांना इंदापूर (जि. पुणे) येथील खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. ९ जानेवारी दुपारी ४ वाजता मुलगा सुनील याचा मृत्यू झाला. तर दहा दिवसानंतर १७ जानेवारी सकाळी आठ वाजता रघुनाथ जाधव हे शुद्धीवर आल्यानंतर हा प्रकार लक्षात आला. मुलाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी व जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी अर्जून रामचंद्र शेटे (रा. करकंब ता. पंढरपूर) व दिनकर शंकर भोसले या दोघांच्या विरोधात टेंभुर्णी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यापुर्वी ही झाला होता हल्ला
अर्जून शेटे याने रघुनाथ जाधव यांची तुळशी हद्दीतील दहा एकर जमिनीचा खरेदी व्यवहार झाला असताना. त्याऐवजी १६ एकर जमीन फसवून खरेदी केली होती. त्या जमिनीच्या पैशांची मागणी जाधव कुटूंबीय वेळोवेळी शेटे यांच्याकडे करत. त्या वादातून यापूर्वी पैशांच्या कारणावरून जाधव यांचा दुसरा मुलगा अमोल याच्यावर अर्जून शेटे व त्याचा साथीदार दिनकर भोसले यांनी जीवघेणा हल्ला केला होता.