भाजप युवा मोर्चा प्रदेशाध्यक्षा पंकजा मुंडे यांची संघर्षयात्रा, तसेच स्टार प्रचारक म्हणून सभा घेतलेल्या ८६पकी ३७ मतदारसंघांत भाजपचे उमेदवार विजयी झाले. १८ मतदारसंघांत दोन्ही काँग्रेसचे उमेदवार पराभूत झाले. केवळ १६ ठिकाणी भाजपचे उमेदवार पराभूत झाले. महिनाभरात अडीचशे सभांचा विक्रम केल्याने ६७ मतदारसंघांत चांगला परिणाम झाला. आक्रमक भाषणशैली व तरुण नेतृत्व यामुळे त्यांच्या सभांनी गर्दी खेचली.
गोपीनाथ मुंडे यांच्या अकाली निधनानंतर त्यांचा राजकीय वारसा चालवण्यासाठी पंकजा मुंडे यांना केंद्रीय मंत्रिमंडळात घ्यावे, अशी मागणी प्रदेश भाजपने केली होती. मात्र, पक्षाने त्यांना प्रतीक्षेतच ठेवले. पंकजा यांनीही ३ महिन्यांत सावरत सिंदखेड राजा येथून पुन्हा संघर्षयात्रा सुरू केली. चार हजार किलोमीटर अंतर पार केल्यानंतर पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्या उपस्थितीत चौंडी येथे यात्रेचा समारोप झाला. यात्रेला मिळालेल्या समर्थनामुळे शहा यांनी पंकजाला स्टार प्रचारक म्हणून घोषित केले.
आक्रमक भाषणशैली, भावनिक साद, उपजत बेधडकपणा व तरुण नेतृत्वामुळे यात्रेतील सभांनी गर्दीचे उच्चांक केले. दीडशे मोठय़ा सभा, तर गावागावात ठिकठिकाणी छोटय़ा-मोठय़ा सभा झाल्या. यात्रेचा समारोप होताच विधानसभा निवडणूक प्रचाराला सुरुवात झाली व १५ दिवसांत पंकजा यांनी शंभर सभा घेतल्या. एका महिन्यात अडीचशे सभा घेण्याचा विक्रम नोंदवून पंकजा यांनी प्रचाराचा धुरळा उडविला. सभांना चांगली गर्दी झाली, इतकी की मध्यरात्रीपर्यंत लोक हजारोंच्या संख्येने वाट पाहत असत. त्यामुळे सभांचा निवडणुकीत किती परिणाम होतो, याकडे सर्वाचे लक्ष होते.
मराठवाडा, विदर्भ, खानदेश व पश्चिम महाराष्ट्रातील ८६ मतदारसंघांच्या निवडणूक निकालात पंकजा यांच्या सभांचा चांगला परिणाम झाल्याचे दिसत आहे. शिवसेनेबरोबरची युती तुटल्यानंतरही पंकजा यांनी बीड जिल्हय़ातील सहापकी ५ जागा, तसेच लोकसभा पोटनिवडणुकीत देशात विक्रमी मतदान घेऊन विजय मिळवला. मराठवाडय़ात भाजपने पहिल्यांदाच १५ जागा जिंकल्या. पंकजा यांच्या सभा झालेल्या ३७ मतदारसंघांत भाजपचे उमेदवार विजयी झाले. १८ मतदारसंघांत दोन्ही काँग्रेसच्या उमेदवारांना फटका बसून सेना व इतर उमेदवार विजयी झाले. १२ मतदारसंघांत तिरंगी-चौरंगी लढती होऊन भाजपचे उमेदवार कमी मतांच्या फरकाने पराभूत झाले. भाजपच्या प्रदेश नेतृत्वाच्या फळीत एका महिन्यात २५० सभा घेणाऱ्या पंकजा एकमेव नेत्या ठरल्या.
पुन्हा सत्तापरिवर्तन!
संघर्षयात्रेचे नियोजक प्रवीण घुगे यांनी सांगितले की, गोपीनाथ मुंडे यांच्या शिवनेरी ते शिवतीर्थ या पहिल्या संघर्षयात्रेने १९९५मध्ये सत्तापरिवर्तन घडविण्यात मोठी भूमिका बजावली. त्यांच्यानंतर पंकजा मुंडे यांच्या पुन्हा संघर्षयात्रेचा सत्तापरिवर्तन घडण्यात मोलाचा वाटा राहिला. प्रचारसभांचे नियोजन करणारे प्रा. देविदास नागरगोजे म्हणाले की, संघर्षयात्रेनंतर निवडणुकीत राज्यभरातून भाजप उमेदवारांनी सभांची मागणी केली होती. दिवसाला ८ ते १२ सभा घेत पंकजा यांनी आपली क्षमता सिद्ध केली.