येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील ड्रायव्हिंग स्कूल चालकांची मनमानी थांबवून कार्यालय दलालमुक्त करावे, या मागणीसाठी युवा फेडरेशनच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी गांधीगिरी केली. या प्रकरणी जाब विचारण्यास गेलेल्या कार्यकर्त्यांनी रिकाम्या दिसलेल्या उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांच्या खुर्चीला बेशरमाच्या फुलांचा हार घातला.
परभणीचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय सध्या दलालांच्या विळख्यात असून, या ठिकाणी ड्रायव्हिंग स्कूल चालकांची मनमानी मोठय़ा प्रमाणात आहे, असा आरोप युवा फेडरेशनच्या कार्यकर्त्यांनी केला. फेडरेशनचे जिल्हाध्यक्ष संदीप सोळुंके व त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रशासकीय इमारतीतील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयात जाऊन या प्रकरणी जाब विचारण्याचा प्रयत्न केला. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी हे पद रिक्त असल्याने कार्यकर्त्यांनी रिकाम्या खुर्चीलाच बेशरमांच्या फुलांचा हार घालून नाराजी व्यक्त केली.
दरम्यान, कार्यकर्त्यांनी गांधीगिरी केल्यानंतर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने कार्यालयात एकही अधिकृत एजंटची नेमणूक करण्यात आली नाही, असा खुलासा करण्यात आला. उपप्रादेशिक परिवहन अधिकारीपद भरण्यासंदर्भात वरिष्ठ कार्यालयास कळविण्यात आले आहे. उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात कर्मचाऱ्यांची अपुरी संख्या असल्यामुळे प्रत्येक विभागाचे कर्मचारी हेच जनसंपर्क अधिकारी म्हणून काम पाहतात. या कार्यालयात बायोमेट्रिक प्रणाली लवकरच चालू करण्यात येईल, असे कार्यालयाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले. मोटार ड्रायव्हिंग स्कूलमधील शुल्कआकारणी या कार्यालयाच्या अधिकार क्षेत्रात येत नाही, असे सांगून कार्यालयाने हात वर केले.
ड्रायव्हिंग स्कूल चालकांची मानमानी थांबवून कार्यालय दलालमुक्त करावे, या मागणीचे निवेदन शनिवारीच युवा फेडरेशनच्या वतीने देण्यात आले होते. त्यानुसार संदीप सोळुंके, सचिन देशपांडे, नामदेव वैद्य, गंगाधर यादव, शेख मुस्तफा, शेख समद, भारत लांडगे, गजानन देशमुख आदींनी ही गांधीगिरी केली.