राज्यातील मतदार विकासाला अर्थात काँग्रेस आघाडीलाच मतदान करतील, गत खेपेपेक्षाही आघाडीची स्थिती उत्तम राहणार आहे. मुंबईतही काँग्रेस आघाडीला चांगले वातावरण असून, सर्व सहाही जागा जिंकू, असा ठाम विश्वास मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केला.
मुख्यमंत्र्यांनी आपला मुलगा जयसिंग व पुतण्या राहुल यांच्यासमवेत आज येथील नगरपालिकेच्या शाळा क्रमांक ८ मधील मतदानकेंद्र क्रमांक ११९ येथे मतदानाचा हक्क बजावला. दरम्यान, मुख्यमंत्री येणार असल्याने चोख बंदोबस्त असताना या परिसरातील नागरिकांमध्ये उत्सुकता होती. मतदान केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी जयसिंग व राहुल चव्हाण यांच्यासमवेत फोटोसाठी पोझही दिली. यानंतर मतदान केंद्राबाहेर ते पत्रकारांशी बोलले. नरेंद्र मोदींकडे ख-या अर्थाने विकासाचा चेहरा नसल्याने ‘मार्केटिंग’च्या माध्यमातून ते जनतेसमोर आले. मात्र, सर्वसामान्य मतदार काँग्रेसलाच मतदान करतील, गतखेपेपेक्षा या वेळी काँग्रेस आघाडीची स्थिती निश्चितच समाधानकारक राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
दुस-या टप्प्यातील मतदानासंदर्भात बोलताना पश्चिम महाराष्ट्रातील काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या बालेकिल्ल्यातील हे मतदान आमच्यासाठी महत्त्वाचे आहे. भ्रष्टाचाराच्या कळीच्या मुद्यावर बोलताना चव्हाण यांनी माहितीचा अधिकार सत्ताधा-यांविरुद्धच वापरला जाणार असतानाही, हे विधेयक मांडून ते संमत करून घेतले. परिणामी, भ्रष्टाचाराला पायबंद घालण्याची भूमिका काँग्रेसनेच घेतली असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले.