श्रद्धा व अंधश्रद्धा याच्या सीमारेषा अतिशय धूसर असून श्रद्धेचे रूपांतर अंधश्रद्धेत कधी झाले याची जाणीवदेखील न होता अनेक जण फसवणुकीस प्रवृत्त होतात. नेमक्या याच बाबीचा लाभ देशभर भोंदूबाबा घेत असून, त्यासाठी नागरिकांनी जागरूक राहण्याचे आवाहन प्रा. श्याम मानव यांनी केले.
समाजकल्याण आयुक्त व जादूटोणाविरोधी कायदा जनजागृती प्रचार आणि प्रसार कार्यक्रम अंमलबजावणी समितीच्या वतीने वैज्ञानिक दृष्टिकोन व जादूटोणाविरोधी कायदा २०१३ या विषयावर ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी पांडुरंग पोले होते. पोलीस अधीक्षक डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी दिनकर जगदाळे, तहसीलदार राहुल खांडेभराड, समाजकल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त माधव वैद्य, समाजकल्याण अधिकारी संजय दाणे यांची प्रमुख उपस्थिती होती.
मानव म्हणाले, आजपर्यंत भोंदूबाबांनी लाखो लोकांना फसवले आहे. कधी हवेतून भस्म काढून दाखव, कधी कुंकू दाखव, कधी सोन्याची चेन तर कधी सोन्याची अंगठी दाखव असे प्रकार झाले. या प्रकाराला अनेक जण बळी पडले. सत्यसाईबाबा यांच्याकडून अनेकांची फसवणूक झाली. देशाचे पंतप्रधानही त्यांच्या चरणावर आपले माथे टेकवत होते. या वेळी श्याम मानव यांनी हवेतून सोन्याची अंगठी व चेन काढून दाखवली. ते म्हणाले, गेल्या ३३ वर्षांपासून सर्व बाबांना चमत्कार दाखवण्याचे आव्हान आपण केले होते व त्यासाठी २१ लाखांचे बक्षीसही जाहीर करण्यात आले होते. मात्र आजपर्यंत एकानेही हे आव्हान स्वीकारले नाही. वैज्ञानिक निकष लावून प्रत्येक बाबीची कारणमीमांसा तपासली पाहिजे व आपली अकारण फसवणूक होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे, असे ते म्हणाले.