औरंगाबादचे नाव बदलण्याच्या मुद्द्यावरून निर्माण झालेल्या वादात आता ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांनीही उडी घेतली आहे. औरंगाबादचे नाव बदलण्यापेक्षा तिथे पाणी द्या, असे सांगत त्यांनी नाव बदलण्याची काहीही गरज नसल्याचे स्पष्ट केले. त्याचबरोबर टोकाचा मुस्लिम द्वेष देशाला पुन्हा फाळणीकडे नेणारा आहे, असाही इशारा त्यांनी दिला.
औरंगाबादचे नाव बदलून संभाजीनगर ठेवावे, अशी मागणी गेल्या काही वर्षांपासून शिवसेना करते आहे. काही दिवसांपूर्वीच नवी दिल्लीतील औरंगजेब रस्त्याचे नाव बदलून माजी राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम यांचे नाव देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्या पार्श्वभूमीवर औरंगाबादचे नाव बदलण्याची पुन्हा एकदा मागणी करण्यात आली आहे. ८८ व्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांनी औरंगाबादला दारा शिकोहचे नाव द्या, असे मत मांडले होते. या सर्व चर्चेवर बोलताना औरंगाबादचे नाव औरंगाबादच राहू द्या. संभाजीनगर पण नको आणि दारा शिकोह पण नको, असे मत नेमाडे यांनी मांडले.
बाबासाहेब पुरंदरे यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार द्यायला माझा तात्त्विक विरोध होता. खरे बोलणे जर दहशतवाद असेल तर फुले, आंबेडकरांना दहशतवादी म्हणावे लागेल, असेही स्पष्टीकरण त्यांनी यावेळी दिले.