अहमदनगरच्या कर्जत तालुक्यातील भांबोरा येथे शुक्रवारी मुलीची छेड काढण्यात आल्याच्या घटनेचे आज गावात संतप्त पडसाद उमटताना दिसत आहेत. भांबोरातील ग्रामस्थ आक्रमक झाले असून त्यांनी आरोपींच्या घरावर हल्ला चढवला आहे. त्यामुळे सध्या या भागात मोठ्याप्रमाणावर तणाव निर्माण झाला आहे. भांबोरा येथे शुक्रवारी पुन्हा एकदा कोपर्डीसारख्या प्रकरणाची पुनरावृत्ती होताना थोडक्यात टळली होती. दरम्यान, ग्रामस्थांनी पकडलेल्या आरोपींना पोलिसांनी जबरदस्तीने नेण्याचा प्रयत्न केल्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी पोलीस कर्मचाऱ्यांना बेदम चोप देत पोलिसांच्या वाहनावरही दगडफेक केली होती. ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालयात तीन पोलीस व तिघा आरोपींना कोंडून ठेवले होते.
आज पुन्हा एकदा या घटनेवरून ग्रामस्थांचा उद्रेक झाला. भांबोरातील ग्रामस्थ आज सकाळी दुधोडी गावात असणाऱ्या आरोपींच्या घरावर चाल करून गेले. ग्रामस्थांनी आरोपींची घरे जेसीबीच्या सहाय्याने उद्ध्वस्त करून ती जाळून टाकली आहेत. दरम्यान, आज सकाळीच नगरचे पालकमंत्री राम शिंदे यांनी भांबोरा गावाला भेट दिली होती.
काल छेडछाडीची घटना उघडकीस आल्यापासूनच गावात प्रचंड तणाव आहे. भांबोरा येथे सकाळी अल्पवयीन मुलगी सायकलवरुन शाळेत जात असताना निर्मनुष्य अशा दुधोडी रस्त्यावर, तोंडाला रूमाल बांधलेल्या दोघांनी तिला अडवले, सायकलवरून खाली ओढले व शेजारील उसाच्या शेतात ओढून नेऊ लागले, तिने जोरदार विरोध केला, तिला जोरात ढकलल्याने तिच्या डोक्यास मार लागला, तेवढयात त्या नराधमाचा मोबाईल वाजल्याने त्यांनी लगेच तिला सोडले व पळून गेले.  नंतर मुलीने शाळेत शिक्षकांना ही घटना सांगितली.
हा सर्व प्रकार समजल्यावर भांबोरा ग्रामस्थ तेथे जमा झाले व त्यांनी पोलिसांची गाडी थांबवली, पकडलेल्या आरोपींना आम्हाला पाहू द्या, असे ग्रामस्थांनी सांगितले. पोलिसांनी त्याला नकार दिला, पोलिसांच्या गाडीत गावक ऱ्यांना बियरच्या बाटल्या दिसल्या. आरोपींना जबरदस्तीने नेण्याच्या पोलिसांच्या  प्रयत्नाला ग्रामस्थांनी विरोध करत तिघा पोलिसांना चोप दिला, गाडीवर दगड मारून काचा फोडल्या, नंतर तीन पोलीस आणि तीन आरोपींना ग्रामपंचायत कार्यालयात कोंडून ठेवले, जिल्हा पोलीस अधीक्षक येईपर्यत सोडणार नाही, अशी भुमिका घेतली होती.