राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा प्रभारी भास्कर जाधव यांची टीका

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत पक्षनेतृत्वाच्या धोरणामध्ये एकवाक्यतेचा अभाव असल्याची टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा प्रभारी भास्कर जाधव यांनी गुरुवारी केली.

चिपळूण नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार ठरवण्याचे सर्वाधिकार पक्षाचे माजी आमदार रमेश कदम यांना दिल्यामुळे जाधव कमालीचे नाराज आहेत. पण त्याबाबत त्यांनी आजपर्यंत जाहीर वाच्यता केली नव्हती.  गुरुवारी  जिल्ह्याच्या निरनिराळ्या भागांमधून आलेल्या पक्षकार्यकर्त्यांपुढे बोलताना मात्र त्यांनी त्याबाबतची मते स्पष्टपणे मांडली. या वेळी जाधव म्हणाले की, निवडणुकांबाबतचा निर्णय सर्वसमावेशक असला पाहिजे. कार्यकर्ता आणि पक्ष एका मार्गाने गेले पाहिजेत. पक्ष संघटितपणे लढला पाहिजे.  पण येथे तसे होताना दिसत नाही. दरम्यान या वादंगावर प्रतिक्रिया देताना, जाधव यांनीच पक्षाचे वाटोळे केले, अशी टीका माजी आमदार कदम यांनी केली आहे. अशा परिस्थितीत या दोघांमधील दरी मिटण्याची सुतराम शक्यता नाही. जाधव यांचे काही जवळच्या समर्थकांनी शिवसेनेमध्ये कालच प्रवेश केला असून जाधव यांच्या पुढील डावपेचांबाबत विविध तर्क बांधले जात आहेत.

कार्यकर्त्यांना अडवणार नाही

जिल्ह्यातील प्रत्येक नगर परिषद निवडणुकीबाबत वेगवेगळे निर्णय झाले आहेत. ही काय पक्षाची शिस्त झाली? अशा परिस्थितीत कार्यकर्त्यांना किती काळ थोपवून धरायचे?  तुमचे राजकीय भवितव्य माझ्या हातात नाही. तुम्हाला मी किती काळ थांबवणार? जिथे तुम्हाला भवितव्य असेल तेथे तुम्ही जा, असा सल्लाही जाधव यांनी कार्यकर्त्यांना दिला. मात्र आपण पक्ष सोडणार नसून पक्षामध्ये सामान्य कार्यकर्ता म्हणून राहू, असे त्यांनी स्पष्ट केले.