लोकसभेपाठोपाठ येणाऱ्या विधानसभा निवडणुकीचा विचार करून रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसअंतर्गत मतभेद सौम्य करण्यात मातब्बर सुनील तटकरे आणि भास्कर जाधव यशस्वी होत असल्याची जोरदार चर्चा येथील राजकीय वर्तुळात सध्या सुरू आहे. त्यामुळे राष्ट्रवादी आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांतील विधानसभेसाठीचे इच्छुक नेते आता मनोमीलन झाल्याच्या आविर्भावात एकत्र शक्तिप्रदर्शन करत असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.
नरेंद्र मोदी यांचे गारुड देशभर सुरू असताना राज्यात राष्ट्रवादीचे दहापेक्षा जास्त खासदार निवडून आणण्याची प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव यांची घोषणा वास्तवात उतरवण्यासाठी पक्षाला खूपच तारेवरची कसरत करावी लागणार आहे. साहजिकच रायगड लोकसभा मतदारसंघातून पक्षाचे हेवीवेट नेते सुनील तटकरे यांच्या विजयाला प्रदेशाध्यक्षांकडून साहजिकच सर्वोच्च प्राधान्य मिळण्याची शक्यता स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये व्यक्त होत आहे.
मुळात मंडणगड, दापोली, खेड, गुहागर, चिपळूण या तालुक्यांचा समावेश असलेल्या उत्तर रत्नागिरीत भास्कर जाधव यांनी स्वत:चा स्वतंत्र दबावगट निर्माण केला आहे. त्याच जोरावर त्यांनी निवडणुकीपूर्वीच रायगडमधील मातब्बर सुनील तटकरे यांना पक्षांतर्गत उघड आव्हान निर्माण केले. विधानसभेसाठी या दोन्ही गटांकडून अनेक उमेदवार इच्छुक आहेत. उत्तर रत्नागिरीत स्थानिक पातळीवर काम करणाऱ्या पक्ष कार्यकर्त्यांवर त्याचा थेट परिणाम होत आहे. रायगड लोकसभा मतदारसंघात उत्तर रत्नागिरीचा मोठा भाग येत असल्याने येथील राष्ट्रवादीचे उमेदवार तटकरे आता पक्षांतर्गत मतभेदाचे हे शिवधनुष्य कसे पेलतात, याकडे सर्वाचे लक्ष होते. पण पक्षश्रेष्ठींनी पक्षाध्यक्षपद देऊन भास्कर जाधव यांच्या वाढत्या महत्त्वाकांक्षेवर आधीच तोडगा काढला होता. त्यामुळेच येथील तटकरेविरोधी वातावरणाला काहीसे सौम्य करण्यात पक्षश्रेष्ठींनी यश मिळवले. त्यानंतरही लोकसभा निवडणुकीत भास्कर जाधव यांचे समर्थक कोणती भूमिका घेतात, याकडे राजकीय निरीक्षकांचे लक्ष होते. पण प्रदेशाध्यक्षांनी आधी लगीन लोकसभेचं, मग विधानसभेचं अशी लढाईची स्पष्ट दिशा आपल्या समर्थकांना दिल्याने त्यांनी तटकरे समर्थकांशी मनोमीलनाचा मार्ग स्वीकारल्याचे चित्र आहे. साहजिकच उत्तर रत्नागिरीत राष्ट्रवादीत झालेले हे हेवीवेट मनोमीलन आता युतीचे अनंत गीते कसे पेलतात, याकडे सर्वाचे लक्ष लागून आहे.
दरम्यान, लोकसभेनंतर विधानसभेची निवडणूक होणार असल्याने उत्तर रत्नागिरीत आघाडीचे अनेक नेते उमेदवारी मिळवण्यासाठी गुडघ्याला बािशग बांधून बसले आहेत. त्यात राष्ट्रवादीबरोबरच काँग्रेसच्या नेत्यांचाही समावेश आहे. उत्तर रत्नागिरीत आतापर्यंत उतरती कळा लागलेली काँग्रेस आणि वरचढ होणारी राष्ट्रवादी यांच्यातील मतभेदच युतीला सक्षम आव्हान देण्यासाठी अडसर ठरलेली आहे. आघाडीतील हे मतभेद लोकसभेसाठी विसरून एकत्र काम करण्याचा आघाडी धर्म दोन्ही पक्ष पाळणार असून, येथे ठिकठिकाणी आघाडीचे शक्तिप्रदर्शन करणाऱ्या तटकरेंच्या एकत्रित सभा पक्षाने नियोजित केल्या आहेत.