माजी केंद्रीय राज्यमंत्री व राष्ट्रवादीच्या नेत्या सूर्यकांता पाटील यांच्या अधिपत्याखालील हुतात्मा जयवंतराव पाटील सहकारी साखर कारखाना माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याने आपल्या ताब्यात घेतला. ‘भाऊराव’ कडे आता चौथ्या कारखान्याची नोंद झाली आहे.
साधारणत: सन १९९० च्या दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सूर्यकांता पाटील यांनी राज्य सहकारी बँक व अन्य वित्तीय संस्थांच्या सहकार्यातून आपल्या वडिलांच्या स्मरणार्थ हदगाव तालुक्यात हुतात्मा जयवंतराव पाटील सहकारी साखर कारखान्याची स्थापना केली. कारखान्याची स्थापना करताना त्यांनी अत्यंत परिश्रम घेतले, शिवाय पहिले काही वर्ष हा कारखाना योग्यरीत्या चालविला. पण गेल्या काही वर्षांत कारखान्यावरील कर्ज वाढले. कारखाना पूर्ण क्षमतेने न चालल्याने नुकसानीचा आकडाही वाढत गेला. अखेर राज्य बँकेने हा कारखाना ‘सिक्युरिटायझेशन अॅक्ट’ खाली ताब्यात घेत थकीत कर्जाची वसुली करण्याचे प्रयत्न सुरू केले.
सुरुवातीला राज्य बँकेने या कारखान्याच्या विक्रीसाठी निविदा प्रसिद्ध केली. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या अधिपत्याखालील भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याचे ४८ कोटी ५१ लाखांत हा कारखाना विकत घेण्याची तयारी दर्शवली. ‘भाऊराव’ ची एकमेव निविदा राज्य बँकेने मान्य करीत त्यांच्याकडून २५ टक्के रक्कम जमा करून घेतली. सूर्यकांता पाटील व अशोक चव्हाण यांच्यातील राजकीय संघर्ष सर्वश्रुत आहे. कारखाना विक्रीसाठी एकमेव निविदा आल्याने ही प्रक्रिया थांबावी, यासाठी पाटील यांच्याकडून बरेच प्रयत्न झाले. पण त्यात त्यांना यश आले नाही.
एकीकडे कारखाना विक्रीची निविदा काढणाऱ्या राज्य बँकेने गतवर्षी हुतात्मा जयवंतराव कारखाना भाडेतत्त्वावर देण्याची निविदा जाहीर केली. पण याविरुद्ध ‘भाऊराव’ ने उच्च न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने ही याचिका निकाली काढल्यानंतर विक्री प्रक्रिया पुन्हा गतिमान झाली. गुरुवारी सकाळी ‘भाऊराव’ चे अध्यक्ष गणपतराव तिडके व अन्य संचालकांनी हुतात्मा जयवंतराव पाटील सहकारी साखर कारखान्याचा ताबा घेतला. या वेळी राज्य बँकेचे अधिकारी उपस्थित होते.
‘भाऊराव’ ने यापूर्वी हिंगोली जिल्ह्य़ातल्या डोंगरकडा,तसेच भोकर तालुक्यातल्या वाघलवाडा हा कारखाना घेतला. आता त्यात हुतात्मा जयवंतराव साखर कारखान्याची भर पडली आहे. माजी मुख्यमंत्री चव्हाण यांनी हा कारखाना सक्षमपणे चालवण्याचे संकेत दिले आहेत. सूर्यकांता पाटील यांची या संदर्भात प्रतिक्रिया समजू शकली नसली, तरी हदगाव तालुक्यातील अनेक ऊस उत्पादकांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. ‘भाऊराव’ने हा कारखाना सक्षमपणे चालवून शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.