केबीसी, पीएमडी, पीएसपीएस, सुपर पॉवर, नवभारत आदी खासगी कंपन्यांकडून दामदुपटीचे आमिष दाखवून लाखो रुपयांची फसवणूक केल्याचे प्रकरण ताजे असतानाच आता परभणीतील बीएचआर मल्टीस्टेट को. ऑ. क्रेडिट सोसायटीमधील १३ लाख रुपयांच्या फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी नानल पेठ पोलीस ठाण्यात या सोसायटीच्या ११ संचालकांसह शाखाधिकारी हार्दिक नवीनचंद्र यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला.
गेल्या ४-५ महिन्यात केबीसी, सुपर पॉवर, पीएमडी आदी खासगी कंपन्यांकडून गुंतवणूकदारांची लाखो रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला. गुंतवणूकदारांना या कंपन्यांकडून अजूनही पसे मिळाले नाहीत. सध्या मल्टीस्टेट को-ऑप. बँकेचे जिल्हय़ात पेव फुटले आहे. परभणीतील गुजरी बाजारमध्ये बीएचआर सोसायटीचे कार्यालय आहे. या सोसायटीत गुंतवणूक करण्यासाठी जास्त व्याजदर देण्याचे आमिष दाखविण्यात आले. या आमिषाला गुंतवणूकदार बळी पडले. अॅड. मयुरी धनराज काकंरिया (शिवाजी चौक) यांनीही जास्त व्याजदराच्या आशेने बीएचआर सोसायटीत मोठी गुंतवणूक केली. गुंतवलेली रक्कम परत मिळावी, म्हणून त्यांनी बँकेकडे चकरा मारणे सुरू केले. परंतु बँकेकडून रक्कम परत करण्यास टाळाटाळ होऊ लागली. अखेर कांकरिया यांनी नानल पेठ पोलीस ठाण्यात फसवणुकीची तक्रार दाखल केल्यावरून बँकेचे संस्थापक भाईचंद रायसोनी, अध्यक्ष दिलीप कांतिलाल चोरडिया, उपाध्यक्ष मोतीलाल ओमकार जिरी, संचालक सुरजमल बथुतमल जैन, दादा रामचंद्र पाटील, भागवत संपत माळी, राजाराम काशीनाथ कोळी, भागवत हिरामण वाघ, (सर्व तळेगाव, जिल्हा जळगाव), डॉ. हितेंद्र यशवंत महादेव, इंद्रकुमार आत्माराम लालवाणी, शेख रमजान शेख नबी (जळगाव), व्यवस्थापक सुखमल राहादू माळी व परभणीतील शाखा अधिकारी हार्दकि नवीनचंद यांच्या विरोधात १३ लाख ४ हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला.