दुष्काळाच्या पाश्र्वभूमीवर जिल्ह्यात विविध ठिकाणी ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’अंतर्गत जलसंवर्धनाची कामे भुजबळ फाऊंडेशनच्या माध्यमातून सुरू करण्यात आली असून, सोमवारी सिन्नर तालुक्यासह अनेक ठिकाणी या कामांना सुरुवात करण्यात आली. दरम्यान, दुष्काळामुळे फाऊंडेशनच्या वतीने यंदा ‘नाशिक फेस्टिव्हल’ होणार नाही, तर त्याच निधीचा वापर महत्त्वपूर्ण जलसंवर्धन कार्यक्रमांवर होणार असल्याची माहिती या वेळी खा. समीर भुजबळ यांनी दिली.
सिन्नर तालुक्यातील सुरेगाव गावतळे, गाळ काढणे, बंधारा दुरुस्ती, तसेच देशमुख वस्तीजवळ जाम तलावातील गाळ काढणे व बंधारा दुरुस्ती या कामांची सुरुवात करण्यात आली आहे. पावसाळ्यापूर्वी कामे पूर्ण करणे हे आव्हान असून पहिल्या सत्रात येवला, नांदगाव, मालेगाव, सिन्नर, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी या तालुक्यातील भूजल पातळी वाढविण्यासाठी सुमारे ९९ ठिकाणी जलसंवर्धनाची कामे हाती घेण्यात येणार असल्याची घोषणाही खा. भुजबळ यांनी केले. नागरिकांची मागणी लक्षात घेता यात अजूनही काही गावे वाढविण्याची शक्यता असून अपूर्ण राहिलेली कामे पुढच्या वर्षीदेखील उन्हाळ्यात सुरू राहतील, असे त्यांनी स्पष्ट केले.
फाऊंडेशनतर्फे तीन वर्षांपासून ‘नाशिक फेस्टिव्हल’चे आयोजन केले जाते. यंदा दुष्काळाच्या पाश्र्वभूमीवर मात्र त्याच निधीचा वापर जलसंवर्धनाच्या कामावर करण्यात येणार आहे. पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली भुजबळ फाऊंडेशनच्या सर्व विश्वस्तांनी हा निर्णय घेतल्याचेही खा. भुजबळ यांनी स्पष्ट केले. येवला तालुक्यातील सुमारे ३९ बंधाऱ्यांमधील गाळ काढणे, बंधाऱ्यांची दुरुस्ती करणे अशा स्वरूपाची कामे केली जाणार आहेत. सिन्नर तालुक्यात ३७, तर त्र्यंबकेश्वर व इगतपुरी तालुक्यातील १८ ठिकाणी विविध प्रकारची जलसंधारणाची कामे करण्यात येणार आहेत. सोमवारी या सर्व भागांमध्ये खा. भुजबळ यांनी सहकाऱ्यांसह दौरा केला. ही सर्व कामे करण्यासाठी निश्चितच मोठय़ा प्रमाणात निधी आवश्यक असल्याने फाऊंडेशनचे विश्वस्त डॉ. भीष्मराज बाम, वंदन पोतनीस, डॉ. अनिरुद्ध धर्माधिकारी, नेमिचंद पोद्दार, रेखा नाडगौडा, आ. जयंत जाधव यांच्या सहकार्याने जिल्ह्यातील अनेकांची मदत घेतली जाणार असल्याचे खा. भुजबळ यांनी नमूद केले.