राज्यस्तरीय श्रीगणेशा लघुचित्रपट महोत्सव २०१६च्या अंतिम फेरीत अलिबागचा ‘फ्रायडे फिल्म्स’ निर्मित ‘भूमिका’ हा लघुचित्रपट सर्वोत्कृष्ट ठरला. नुकताच त्याचा भव्य बक्षीस वितरण सोहळा ठाणे येथील ‘काशिनाथ घाणेकर’ नाटय़गृहात पार पडला.
राज्यातील तरुण अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक यांना एक भव्य व्यासपीठ निर्माण करून देणाच्या उद्देशाने ठाणे येथील ‘श्रीगणेशा’ या संस्थेने नुकतेच श्रीगणेशा फिल्म फेस्टिव्हलचे आयोजन केले होते.
त्यामध्ये महाराष्ट्रातून मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुणे, रायगड, अलिबाग, नाशिक, बीड, बुलढाणा या विविध जिल्ह्यांतून अनेक लघुचित्रपट महोत्सवात सहभागी झाले होते. त्यातून १६ लघुपट अंतिम फेरीकरिता निवडण्यात आले. त्यामध्ये अलिबागचा ‘फ्रायडे फिल्म्स’ निर्मित किरण साष्टे दिग्दíशत ‘भूमिका’ हा लघुचित्रपट सर्वोत्कृष्ट ठरला. सदर लघुपटास स्मृतिचिन्ह व रोख रक्कम देऊन संजय केळकर, दिग्दर्शक बिजू माने, छायाचित्रकार अनिकेत के, अभिनेता प्रतीक कदम व आयोजक किरण हरचांदे यांच्या हस्ते गौरविण्यात आले.
किरण साष्टे यांच्या कलारंग निर्मित ‘दादूस’ या लघुपटालाही २०१३ मध्ये मुंबई फेस्टिव्हलमध्ये सर्वोत्कृष्ट लघुपटाचे पारितोषिक देऊन गौरविण्यात आले होते. या लघुपटाने अलिबागच्या सांस्कृतिक प्रवाहाची एक वेगळी ओळख निर्माण केली. त्याच धर्तीवर ‘भूमिका’ या लघुचित्रपटाने सर्वोत्कृष्ट पारितोषिक पटकावून पुन्हा एकदा अलिबागच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला.
सदर चित्रपटाचे लेखन चताली गानू, संगीत विक्रांत वार्डे, कॅमेरा सुनीत गुरव, कला निखिल कदम, लाइट्स सुनील यादव, वेशभूषा चंद्रशेखर केमनाईक, वेशभूषा सायली हेंद्रे व अन्य कलाकारांनी परिश्रम घेतले असून सर्वावर अभिनंदनाचा वर्षांव होत आहे.