आरोप-प्रत्यारोप आणि विविध वादांमुळे गाजलेल्या अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषद नियामक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत मुंबई विभागाच्या सुमारे १,२५७ मतपत्रिका बनावट आढळून आल्याने या विभागाची मतमोजणी प्रक्रिया स्थगित ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
या संपूर्ण निवडणूक प्रक्रियेत बराच गोंधळ झाल्याचे निष्पन्न झाले असून या संदर्भात सहधर्मदाय आयुक्तांशी चर्चा करून मंडळाची संपूर्ण निवडणूक प्रक्रिया रद्द करण्याची शिफारस केली जाईल, अशी माहिती प्रमुख निवडणूक अधिकारी विश्वास ठाकूर यांनी येथे पत्रकार परिषदेत दिली. याच कारणास्तव नाटय़ परिषदेच्या इतर विभागांचे निकालही राखीव ठेवण्यात आले आहेत.
परिषदेच्या निवडणुकीत मुंबई विभागात १६ जागांसाठी ५८ उमेदवार रिंगणात आहेत. मुंबई विभागातील मतदारांची संख्या ६,०४९ आहे. पत्ता न सापडल्याने १३३ मतपत्रिका परत आल्या. पात्र मतदारांची संख्या ५,९२६ असताना छाननीतच त्यांची संख्या ५,९९९ पर्यंत गेली. म्हणजे ८३ मतपत्रिका अधिक असल्याचे आढळून आले.
घटनेच्या तरतुदीनुसार मतपत्रिका घरी पाठविल्या जातात. परंतु अनेकांनी त्या मिळाल्याच नसल्याची तक्रार केली आहे. त्यातच कागद, शाई, पाकीट यात बदल असलेल्या १,२७८ मतपत्रिका बनावट असल्याचे निष्पन्न झाले. त्यांची  छाननी करण्यासाठी निवडणूक अधिकाऱ्यांनी तातडीने तीन तज्ज्ञांची नेमणूक केली आहे. हे तज्ज्ञ मत्रपत्रिकांची छाननी करून बनावट मतपत्रिकांची ओळख पटवतील. त्यांच्या अहवालानंतर पोलीस ठाण्यात अधिकृत गुन्हा नोंदवण्यात येईल, असेही ठाकूर यांनी नमूद केले. तोपर्यंत प्रक्रिया स्थगित करण्यात आली आहे.
रंगमंच कामगार सेनेचा गोंधळ
उत्स्फूर्त पॅनेलचे दीपक करंजीकर आणि नटराज पॅनलचे अशोक हांडे हे मतमोजणीच्या ठिकाणाहून वृत्तवाहिनीशी बोलत असताना रंगमंच कामगार सेनेच्या काही प्रतिनिधींनी मध्येच बोलायला सुरुवात केली. त्यावेळी झालेल्या शाब्दिक चकमकीचे रूपांतर हमरीतुमरीमध्ये झाले आणि नाटय़ परिषदेच्या आवाराला रणांगणाचे स्वरूप आले. विशेष म्हणजे पोलिसांनीही बघ्याची भूमिका घेतली.
सीआयडी चौकशी करा -विनय आपटे
नटराज पॅनलच्या प्रमुख विनय आपटे यांनी या सगळ्या बनावट मतपत्रिका प्रकरणी सीआयडी चौकशी करण्यात यावी. दोषींचे सदस्यत्व रद्द करून पारदर्शक पद्धतीने पुन्हा एकदा निवडणूक प्रक्रिया व्हावी अशी मागणी केली आहे.
पुन्हा निवडणूक नको
बनावट मतपत्रिका आणि त्यांच्याविरुद्ध असलेल्या इतर १२७८ मतपत्रिका अशा अडीच हजार मतपत्रिका वगळून इतर मतमोजणी करावी. त्यानुसार आलेला निर्णय राखीव ठेवण्यात यावा. मात्र, पुन्हा निवडणूक घेऊ नये, असे मत उत्स्फूर्त पॅनलचे मोहन जोशी यांनी व्यक्त केले. तर, पुन्हा निवडणुका घेऊन परिषदेचा आणि पर्यायाने जनतेचा पैसा खर्च करणे हे लाजिरवाणे आहे. मात्र त्याशिवाय गत्यंतर नाही, असे अपक्ष उमेदवार प्रमोद पवार म्हणाले.