वाढती महागाई, बेरोजगारी, सार्वजनिक उद्योगांचे खासगीकरण, उद्योजकांना दिली जाणारी विशेष मदत, कामगारांना किमान वेतन १० हजार रुपये द्यावे आदी मागण्यांसाठी येथे जिल्हाधिकारी कार्यालयावर कर्मचारी व कामगार संघटनांच्या वतीने मोर्चा काढण्यात आला.
शिवतीर्थपासून निघालेला मोर्चा जेलरोड, आग्रारोड, मनपामार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. या मोर्चात महसूल कर्मचारी संघटना, इंटक, भारतीय मजदूर संघ, भारतीय कामगार सेना, असंघटित कामगार संघटना, राज्य कर्मचारी संघटनेसह शिवसेना, मनसेचे काही पदाधिकारी सहभागी झाले होते. संपात जिल्हा रुग्णालयातील कर्मचारी व परिचारिका यांनीही सहभाग घेतल्याने त्याचा परिणाम रुग्णसेवेवर झाला. त्यामुळे प्रशासनाला गृहरक्षकांची मदत घ्यावी लागली. मोर्चात राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष डॉ. संजय पाटील, शिवसेनेचे आ. शरद पाटील, एम. जी. धिवरे आदींसह अनेक नेते उपस्थित होते.