सुमारे दीड लाख टन वजनापेक्षा जास्त माल घेऊन येणाऱ्या मोठय़ा क्षमतेच्या जहाजांना माल उतरण्यासाठी आता रत्नागिरी जिल्ह्य़ातील जयगड बंदराचा पर्याय खुला झाला आहे.
पश्चिम किनारपट्टीवरील महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन्ही राज्यांमध्ये मोठय़ा जहाजांसाठी आवश्यक खोलीचे समुद्रकिनारे नसल्यामुळे येथील बंदरांवर या जहाजांची मालाची ने-आण होऊ शकत नसे. पण जेएसडब्ल्यू कंपनीतर्फे जयगड येथे विकसित करण्यात आलेल्या बंदरामध्ये तशी खोली उपलब्ध झाल्यामुळे आता येथे मोठी जहाजे लागणे शक्य होणार आहे. अशा प्रकारच्या पहिल्या मोठय़ा जहाजाचे शनिवारी या बंदरात आगमन झाले. आफ्रिकेहून १ लाख ६८ हजार टन कोळसा घेऊन निघालले ‘इंडियन फेंड्रशिप’ हे जहाज शनिवारी जयगड बंदरात दाखल झाले. या जहाजातील कोळसा उतरवण्याचे क=ाम ४० तासांत पूर्ण केले जाणार आहे.
कोकण किनारपट्टीवरील या खासगी बंदराच्या विकासातील हा महत्त्वाचा टप्पा साजरा करण्यासाठी जेएसडब्ल्यूचे संचालक एन. के. जैन, मुख्य कार्यकारी अधिकारी कॅ.बी. व्ही. जे. के. शर्मा, राज्य शासनाच्या बंदर विभागाचे सहायक मुख्य सचिव गौतम चतर्जी, कोकण रेल्वेच्या वाणिज्य विभागाचे संजय गुप्ता इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी चतर्जी म्हणाले की, खासगी बंदर विकासाला प्राधान्य देण्याचे राज्य शासनाचे धोरण असून शक्य तेथे शासनाच्या भागीदारीतूनही हा विकास करण्यात येईल. त्याचबरोबर बंदरापासून अंतर्भागात रस्ते आणि रेल्वेमार्गाचे जाळे निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले जातील. कोकणच्या किनारपट्टीवरील दिघी, डहाणू, नांदगाव, रेवस इत्यादी बंदरांचा त्या दृष्टीने विचार चालू आहे. मात्र हे करत असताना अशा ठिकाणी आवश्यक कुशल मनुष्यबळ उपलब्ध होण्यासाठी मेरीटाइम युनिव्हर्सिटीच्या सहकार्याने कौशल्य विकासाचे अभ्यासक्रमही या परिसरात सुरू करण्यात यावेत, अशी सूचना चतर्जी यांनी केली.
जयगड बंदरातून सध्या वर्षांला २७ दशलक्ष टन मालाची चढ-उतार केली जाते. पण आगामी पाच वर्षांत हे प्रमाण दसपट, २०० दशलक्ष टनापर्यंत नेण्याची महत्त्वाकांक्षा कॅप्टन शर्मा यांनी याप्रसंगी बोलून दाखवली. मोठय़ा क्षमतेच्या जहाजांमुळे इंधन आणि वेळेची लक्षणीय बचत होते. म्हणून अशा प्रकारची बंदरे विकसित करणे गरजेचे आहे. आगामी काळात सुमारे ३ ते ४ लाख टन वजनाच्या मालवाहू जहाजांबरोबरच एकावेळी १८ हजार कंटेनर असलेले जहाजही या बंदरात लागू शकेल, अशी सुविधा निर्माण करण्याचा मनोदय आहे. त्याचबरोबर नैसर्गिक वायू आणि कच्चे तेल आणून त्याच्या साठवणुकीची व्यवस्था उपलब्ध करुन दिली जाणार आहे. कच्च्या तेलावरील प्रक्रियेसाठी रिफायनरीचाही उद्योग विकसित करण्याची कल्पना कॅप्टन शर्मा यांनी मांडली.