वेकोलिच्या वणी क्षेत्रातील कोळसा बनावट पावतीच्या आधारे खासगी भूखंडावर उतरवून त्याची विक्री करण्यारे मोठे घबाड घुग्घुस पोलिसांनी उघडकीस आणले आहे. याप्रकरणी ८ जणांना अटक करण्यात आली असून अन्य आरोपी फरार आहेत. यात चंद्रपूर, नागपूर व वणी येथील मोठे कोळसा व्यापारी व वाहतूकदार सहभागी असल्याची धक्कादायक माहिती आहे. हा व्यवहार कोटय़वधी रुपयांचा आहे. दरम्यान, अनेक कोलमाफिया फरार झाले आहेत. वणी क्षेत्रातील नायगाव कोळसा खाणीतून ९ फेब्रुवारी २०१५ ला ट्रकचालकांनी प्रतिट्रक २० टन कोळसा भरला. हा कोळसा बुटीबोरी येथील विदर्भ इंडस्ट्रीज पॉवर लिमिटेड येथे उतरावायचा होता, परंतु कोळसा तेथे पोहोचलाच नाही. वणीतील एका खासगी कोळसा डेपोत तो उतरविण्यात आला. वाहतूकदाराला याची कल्पना येऊ नये म्हणून विदर्भ इंडस्ट्रीजमध्ये कोळसा खाली केल्याच्या बनावट पावत्या तयार करण्यात आल्या. ज्यावेळी वाहतूकदाराने कोळशाचे बिल संबंधित कंपनीकडे पाठविले तेव्हा हा ट्रक क्रमांकातील कोळसा पोहोचलाच नसल्याचे स्पष्ट केले. मात्र, वाहतूकदाराने वाहनचालकांनी कोळसा उतरविल्याची पावती कंपनीच्या अधिकाऱ्यांना दाखविली. त्यावेळी अधिकाऱ्यांनी ती बनावट असल्याचे स्पष्ट केल्याने कोळशात हेराफेरी झाल्याचे स्पष्ट झाले. वाहतूकदार सतीश देवतळे यांनी घुग्घुस पोलिस ठाण्यात तक्रार दिली. यावरून चालक शंकर शेंडे याला अटक केली असून दुसरा चालक अनिल चौधरी फरार झाला आहे. पोलिस तपासात कोल डेपोधारकांचाही समावेश असल्याचे समोर आले. त्यानंतर धनराज आत्राम, ट्रान्सपोर्ट कंपनीचे पर्यवेक्षक जयंतराव पाईक, इरफान शेख यांना अटक करण्यात आली. अन्य एका प्रकरणात सपरा ट्रान्सपोर्ट कंपनीचे पर्यवेक्षक रितेश जयस्वाल यांच्या तक्रारीवरून अन्य पाच आरोपींना अटक करण्यात आली. सपरा ट्रान्सपोर्ट कंपनीच्या ट्रकचालकांनी २० आणि २१ जानेवारीला नायगाव कोळसा खाणीतून कोळसा भरून बुटीबोरी येथील रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये खाली करण्याऐवजी नागपूरच्या वाठोडा येथील एका खासगी भूखंडावर तो उतरविण्यात आला.