ज्येष्ठ नागरिक संघाचा वर्धापन दिन उत्साहात साजरा

पनवेलमधील ज्येष्ठ नागरिक संघाचा ११वा वर्धापन दिन नुकताच उत्साहात साजरा करण्यात आला. ज्येष्ठ नागरिक

प्रतिनिधी, पनवेल | February 8, 2013 05:18 am

पनवेलमधील ज्येष्ठ नागरिक संघाचा ११वा वर्धापन दिन नुकताच उत्साहात साजरा करण्यात आला. ज्येष्ठ नागरिक संघाच्याच सभागृहात हा दोनदिवसीय समारंभ रंगला. या कार्यक्रमात अनेक ज्येष्ठ नागरिक सहभागी झाले होते.
प्रसिद्ध निवेदक व व्याख्याते डॉ. विश्वास मेहेंदळे या कार्यक्रमाला प्रमुख
अतिथी या नात्याने उपस्थित होते, तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान साहाय्यक पोलीस आयुक्त दिलीप माने यांनी भूषविले. स्वागतगीत व मनुसूक्ताने या कार्यक्रमाची सुरुवात झाली. शैक्षणिक यश संपादन करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांच्या नातवंडांचे डॉ. मेहेंदळे व माने यांच्या हस्ते कौतुक करण्यात आले. तसेच वयाची पंचाहत्तरी पार करणाऱ्या काही ज्येष्ठ नागरिकांचाही डॉ. मेहेंदळे व माने यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. संघाचे अध्यक्ष जयंत वझे यांनी चालू वर्षांतील महत्त्वाच्या घटनांचा आढावा घेतला.  डॉ. मेहेंदळे यांचे भाषण हे या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरले. आपल्या देशात विविध प्रांतांत निरनिराळ्या भाषा कशा प्रकारे विकसित होत गेल्या, याचे त्यांनी अभ्यासपूर्ण विवेचन केले. प्रसंगी खुमासदार शैलीत केलेल्या विनोदांमुळे आपले भाषण कंटाळवाणे होणार नाही, याचीही त्यांनी काळजी घेतली. साडेतीनशे ज्येष्ठ नागरिकांनी टाळ्यांच्या गजरात मेहेंदळे यांना पसंतीची पावती दिली.  संघाचे कोषाध्यक्ष रानडे यांनी सर्वाचे आभार मानले.  या वर्धापन सोहळ्याच्या पहिल्या दिवशी ज्येष्ठ नागरिक संघाच्या सभागृहात ‘संगीत सौभद्र’ या नाटकाचा प्रयोग रंगला.
परशुराम महाबळ यांच्या काव्यसंग्रहाचे प्रकाशन
संघाचे सदस्य आणि पनवेलचे रहिवासी परशुराम आत्माराम महाबळ यांच्या ‘दरवळ’ या काव्यसंग्रहाचे या कार्यक्रमादरम्यान डॉ. विश्वास मेहेंदळे यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. डॉ. मेहेंदळे यांनी तसेच संस्थेचे माजी अध्यक्ष मोघे यांनी महाबळ यांच्या या वयातील प्रतिभेचे कौतुक केले. या काव्यसंग्रहाला ज्येष्ठ संगीतकार यशवंत देव यांची प्रस्तावना लाभली असून त्यांनीही महाबळ यांच्या कवितांना दाद दिली आहे.

First Published on February 8, 2013 5:18 am

Web Title: birthday anniversary celebration of senior citizen association